महागाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टीने काढला ‘धक्का मारो’ मोर्चा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:26 AM2021-06-16T04:26:17+5:302021-06-16T04:26:17+5:30
अकोला : पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेलाची दरवाढ कमी करून वीजबिल माफ करण्याची मागणी करीत बहुजन मुक्ती ...
अकोला : पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेलाची दरवाढ कमी करून वीजबिल माफ करण्याची मागणी करीत बहुजन मुक्ती पार्टी युवक व महिला आघाडी जिल्हा शाखेच्या वतीने मंगळवारी महागाईविरोधात ‘धक्का मारो’ माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे सादर करण्यात आले.
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसची दरवाढ कमी करावी, खाद्यतेल व जीवनावश्यक खाद्य पदार्थांचे दर कमी करण्यात यावेत, वीजबिल माफ करण्यात यावे इत्यादी मागण्यांसह महागाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी युवक आघाडी व महिला आघाडी जिल्हा शाखेच्या वतीने शहरातील अशोक वाटिका येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
महागाईविरोधात दुचाकी व चारचाकी वाहनांना धक्का देत मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे सादर करण्यात आले. या मोर्चात बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष प्रवीणा भटकर, नेहा शेगोकार, वंदना अवचार, वैशाली इंगोले, युवक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष चंदन वानखडे, राहुल इंगळे, नागेश राऊत, आकाश चापके, सुभेदार हातोले यांच्यासह बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी व युवक आघाडीचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
चूल पेटवून जाळले विजबिल!
मोर्चा दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून वीजबिल जाळण्यात आले. तसेच राज्य सरकारने वीजबिल माफ करण्याची मागणी बहुजन मुक्ती पार्टी महिला व युवक आघाडीच्या वतीने या वेळी करण्यात आली.
.................फोटो...........................