अकोला: स्थानिक जठारपेठ स्थित स्वा. सावरकर सभागृहात बाल शिवाजी शाळेचा 'आजी आजोबा मेळावा ' उत्साहात पार पडला. या मेळाव्याकरिता प्रमुख पाहुणे म्हणून अकोल्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक,तसेच अकोला अर्बन बँकेचे अध्यक्ष नरेंद्रजी पाठक व सौ. वैजयंती पाठक लाभले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिप-प्रज्वलनाने झाली. यावेळी गार्गी विहार गाडगीळ व प्रचिती उज्वल चोरे ह्यांनी श्लोक पाठांतर उत्कृष्टरित्या सादर केले. स्वरा प्रफुल्ल भालतिलक हिने नाट्यछटा उत्तम सादर केली. वर्ग ४ थी च्या विद्यार्थ्यांनी 'राधेची भक्ती' ही नाटिका सादर केली. गार्गी आशुआल्हाद भावसार हिने स्वरचित कविता सादर केली. तत्पूर्वी सकाळी आजी आजोबा मेळाव्यानिमित्य आजी - आजोबांकरिता विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामधील विजयी स्पर्धक १) स्मरणशक्ती स्पर्धा - आजोबांमधून श्री. मधुकर सरप, आजीमधून सौ. कुमुदिनी ठाकरे २) टूथपिकमध्ये थर्माकॉल बॉल ओवणे - श्री. अशोकराव शिंदे ३) डोळे बंद करून भाजी निवडणे - पंचफुला लव्हाळे तर संगीत खुर्ची - श्री. रामराव पाटील व सौ. प्रतीक्षा देशपांडे, ४) चिमट्याने टूथपिक उचलणे (जोडी- स्पर्धा ) रामभाऊ लोथे, सौ. निर्मला लोथे तसेच प्रश्नावलीचे उत्तम लेखन करणारे प्रा. सौ. विजया खांडेकर आणि श्रीमती कुसुमताई ताथोड या विजयी स्पर्धकांना पाहुण्यांच्या व शाळेचे अध्यक्ष अविनाश देव यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. प्रमुख पाहुणे श्री. पाठक सर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, विद्यार्थ्यांची ज्ञान - जिज्ञासा पूर्ण करावी. नातवंडांवर उत्तम संस्कार करावे. आपापसात सहकार्य करावे. यासाठी 'एकी हेच बळ' ही गोष्ट सांगितली. तसेच आजी - आजोबांमधून श्रीमती कुसुमताई ताथोड, श्री. प्रभाकर भावसार. सौ. विजया खांडेकर आणि श्री. सुधाकर गाडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष अविनाश देव, शाळा समिती सद्स्या सौ. अनघाताई देव, मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे, सौ. संगीता जळमकर,माझी बाळ शाळेच्या प्रमुख भावना उपासने, शिक्षक वृंद तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. भारती कुळकर्णी व संचलन सौ. धनश्री रेलकर यांनी केले. अध्यक्षांच्या हस्ते प्रमुख पाहूण्यांना भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. त्यानंतर आजी- आजोबांना अल्पोपहार देण्यात आला.