शरीराचे संतुलित तापमान करेल उष्माघातापासून बचाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:52 PM2019-04-29T12:52:44+5:302019-04-29T12:52:53+5:30
अकोला: उन्हाचा पारा सध्या आपलेच रेकॉर्ड मोडतो आहे. परिणामी, उष्माघात आणि त्यामुळे मृत्यू होण्याची भीतीही वाढली आहे. यापासून स्वत:चा बचाव करायचा असेल, तर शरीराचे तापमान संतुलित राखण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
अकोला: उन्हाचा पारा सध्या आपलेच रेकॉर्ड मोडतो आहे. परिणामी, उष्माघात आणि त्यामुळे मृत्यू होण्याची भीतीही वाढली आहे. यापासून स्वत:चा बचाव करायचा असेल, तर शरीराचे तापमान संतुलित राखण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.
अकोल्यात जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद मागील काही दिवसांपासून केली जात आहे. हीच स्थिती आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. वाढत्या तापमानामुळे शरीराचे तापमानदेखील प्रभावित होते. त्यामुळेच चक्कर येणे, उलट्या होणे, उन्हाळी सर्दी, डोकेदुखी, ताप येणे आणि जास्तच प्रभावित झाल्यास उष्माघाताची शक्यताही नाकारता येत नाही. शरीराचे तापमान गरजेपेक्षा जास्त वाढल्यास या प्रकारचे धोके संभावतात. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसांत उष्माघातापासून बचाव करायचा असेल, तर भरपूर पाणी प्यावे, असे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.
शरीराचे तापमान हवे ३७ अंश सेल्सिअस
साधारणत: मानवी शरीराचे तापमान ३७ अंश सेल्सिअस असते. या तापमानातच शरीरातील सर्व अवयव नीट काम करू शकतात. वातावरणातील तापमान वाढल्यास शरीर घामाच्या स्वरूपात पाणी बाहेर काढून शरीराचे तापमान ३७ अंश सेल्सिअस राखते; परंतु सतत घाम निघाल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे सतत पाणी पित राहणे गरजेचे असते; परंतु अनेकदा असे होत नाही. पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामे करते, त्यामुळे शरीरातील पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणे टाळते. जेव्हा बाहेरचे तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते, त्यावेळी शरीरातील कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प पडते. तेव्हा शरीराचे तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ लागते.
उष्माघातामुळे मृत्यू का होतो?
रक्तातील पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होते, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होते, महत्त्वाच्या अवयवांना विशेषत: मेंदूला रक्त पुरवठा थांबतो. त्यामुळे माणूस कोमात जाऊ शकतो. असे करता करता त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढवतो.
उन्हाळ्याच्या दिवसांत शक्यतो सुती व पांढऱ्या रंगाचे वस्त्र वापरावे. कोल्ड्रिंकऐवजी लिंबू सरबत, नारळ पाण्याचे सेवन करावे, अशक्तपणा व ताप वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.