एटीएम कार्डसह बँक काढते प्रत्येक ग्राहकाचा विमा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:58 AM2017-11-25T00:58:23+5:302017-11-25T01:00:51+5:30
एटीएम कार्डधारकांस कार्ड देत असतानाच संबंधित बँकेकडून त्या ग्राहकाचा वीमा काढला जातो; मात्र याबाबतची माहिती ग्राहकांना नसल्याने कुणी दावा करण्याच्या भानगडीत पडत नाही, त्यामुळे एटीएम विमा संदर्भात जनजागृती करण्याची आणि विमाप्रकरणी दावा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
संजय खांडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मुंबईतील बँक लॉकर लुटल्याच्या घटनेतून बँक सुरक्षेचे अनेक नियम आणि मिळत असलेल्या सुविधा समोर येत आहेत. ग्राहक सुरक्षेच्या दिशेने बँकेकडून दिल्या जाणार्या अनेक सेवा- सवलतींची माहिती सर्वसामान्य नागरिकांना नाही. एटीएम कार्डधारकांस कार्ड देत असतानाच संबंधित बँकेकडून त्या ग्राहकाचा वीमा काढला जातो; मात्र याबाबतची माहिती ग्राहकांना नसल्याने कुणी दावा करण्याच्या भानगडीत पडत नाही, त्यामुळे एटीएम विमा संदर्भात जनजागृती करण्याची आणि विमाप्रकरणी दावा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांचे अनेक एटीएम कार्ड अलिकडे मोठय़ा प्रमाणात वापरले जातात. त्यात डेबीट आणि क्रेडीट कार्ड या दोन वेगवेगळ्य़ा सेवा आहेत. एटीएम कार्डधारक व्यक्तीचा अपघात झाल्यास किंवा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला एटीएमच्या विम्याचा लाभ घेता येतो. संबंधित एटीएम कार्ड असलेल्या बँकेकडून नियमानुसार अकस्मात घटनेतील नुकसान भरपाई मिळू शकते. हक्काची विम्याची रक्कम अनेक जण मागत नाहीत. कारण याबाबत अनेकांना माहिती नसल्याने असल्या प्रकारचे दावेच दाखल होत नाही त. यासंदर्भात ग्राहकाने आपल्या बँकेत जाऊन अथवा दूरध्वनीवरून माहिती घ्यावी. जर ही माहिती बँकेकडून दिली जात नसेल तर ग्राहक न्यायालयात दाद मागण्याची तरतूददेखील आहे.
काय म्हणतो नियम..
एटीएम कार्डासोबतच ग्राहकाचा विमा बँकेकडून काढला जातो. ५0 हजाराच्या रकमेपासून तर १0 लाखांच्या रकमेपर्यंत विमा काढलेला असतो. यामध्ये हात-पाय गमाविल्याचा आणि जीव गमाविल्याचा वेगळा विमा मिळू शकतो. साधे डेबीट एटीएम कार्ड, मास्टर कार्ड, प्लॅटीएम कार्ड, मास्टर प्लॅटीएम कार्ड याप्रमाणे रकमेचा स्लॅब वाढविलेला असतो. एटीएम कार्ड मागिल साठ दिवसांत उपयोगात आलेले असावे, बँक पासबुक खात्यात ताज्या नोंदी असाव्यात, खाते निष्क्रिय किंवा बंद नसावे, असे नियम यासाठी लागू आहेत.
विमा मिळविण्याचे दस्तावेज
अपघाती मृत्यू झाल्यास एटीएम विम्याची नुकसान भरपाई मिळविण्यासाठी शवविच्छेदन प्रमाणपत्र, पोलीस रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र, चालू असलेले ड्रायव्हिंग लायसन्स आणि बँकेचा अहवाल या दाव्यासाठी जोडणे आवश्यक आहे. अपघाती अपंगत्व आल्यासदेखील त्या-त्या विभागाचे संबंधित दस्तावेज आवश्यक आहेत. एटीएम विम्याची रक्कम मिळविण्याचा दावा करण्याचे प्रकरण अद्याप समोर आलेले नसल्याने याबाबत पाहिजे तसा प्रचार व प्रसार झालेला नाही.