बँकांमधील गर्दी ओसरली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2016 02:17 AM2016-11-18T02:17:26+5:302016-11-18T02:17:26+5:30
ग्राहकांप्रमाणेच बँकांनासुद्धा नव्या पाचशेच्या नोटांची प्रतीक्षा.
अकोला, दि. १७- चलनातून हजार व पाचशेच्या नोटा रद्द झाल्यानंतर नोटा बदलून घेण्यासाठी गत आठ दिवसांपासून बँकांसमोर होत असलेली नागरिकांची गर्दी गुरुवारी थोड्या प्रमाणात कमी झालेली दिसून आली. बँकांप्रमाणेच आता एटीएम मधूनसुद्धा नवीन दोन हजाराच्या नोटा मिळण्यास प्रारंभ झाला असल्याने ही गर्दी ओसरली आहे. दरम्यान, गुरुवारी बँका व एटीएममधून नव्या पाचशेच्या नोटा वितरित होणार होत्या; परंतु सायंकाळपर्यंंंंत या नोटा उपलब्धच झाल्या नसल्याने, ग्राहकांप्रमाणेच आता बँकांनासुद्धा पाचशेच्या नोटांची प्रतीक्षा लागली आहे.
चलनातून बाद झालेल्या नोटा बदलून घेण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून शहरातील बँकांमध्ये गर्दी उसळली होती. जुन्या नोटा बदलण्यासाठी येणार्या ग्राहकांना नव्या दोन हजाराच्या नोटा वितरित करण्यात आल्या. ग्राहकांना दैनंदिन आर्थिक व्यवहार सुरळीत करता यावे यासाठी, रिझर्व बँकेने शंभराच्या नोटांचासुद्धा मोठय़ा प्रमाणात पुरवठा केला. रिझर्व बँकेकडून प्राप्त झालेली ही रोकड स्टेट बँकेच्या व बँक ऑफ महाराष्ट्रच्या करन्सी चेस्टद्वारे शहरातील इतर बँकांना वितरित करण्यात येत आहे. खात्यातून पैसे काढण्यासाठी तसेच चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी १0 नोव्हेंबरपासून शहरातील बँकांमध्ये उसळलेली ही गर्दी गुरुवारी बर्यापैकी ओसल्याचे दिसून आले. गुरुवारी पहाटेपासूनच शहरातील बहुतांश एटीएम केंद्रांमधून दोन हजाराच्या नोटा मिळण्यास प्रारंभ झाल्याने, ग्राहकांनी आपला मोर्चा बँकांऐवजी, आता एटीएम केंद्रांकडे वळविला असल्याचे दिसून आले. गुरुवारी शहरातील अनेक एटीएम केंद्रांवर पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी रांगा लावल्या होत्या.
स्टेट बँक व महाराष्ट्र बँकेच्या करन्सी चेस्टला बुधवारीच रिझर्व बँकेकडून नव्या पाचशेच्या नोटा प्राप्त होणार होत्या; मात्र रिझर्व बँकेकडूनच पुरवठा नसल्याने, ग्राहकांप्रमाणेच आता बँकांनासुद्धा नव्या पाचशेच्या नोटांची प्रतीक्षा लागली आहे. अकोला, बुलडाणा व वाशिम या तिन्ही जिल्हय़ांना शनिवारपर्यंंंंत नव्या पाचशेच्या नोटांचा पुरवठा होऊ शकतो, अशी शक्यता दोन्ही बँकेच्या अधिकार्यांनी व्यक्त केली आहे.
सामाजिक संस्थांचा सेवाभाव
गुरुवारीसुद्धा आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँकेसमोर रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांची अनेक सामाजिक व सेवाभावी संस्थांनी भूक भागवली. गोरक्षण मार्गावरील सेंट्रल बँकेत जमलेल्या ग्राहकांना जय गजानन या सेवाभावी संस्थेच्यावतीने दुपारी प्रसाद वितरित करण्यात आला. ग्राहकांना सावलीत उभे राहता यावे, याकरिता अनेक बँकांसमोर उभारण्यात आलेले मांडव कायम होते. स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसह इतर अनेक बँकांमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांंंंनी चहा-बिस्किट व पाणी वितरित केले.
पोस्टाचे एटीएम केवळ खातेधारकांसाठी!
पोस्टाचे एटीएम केवळ खातेधारकांसाठी असल्याची बाब गुरुवारी स्पष्ट झाली. इतर राष्ट्रीयीकृत वा खासगी एटीएमप्रमाणे या एटीएममधून बँकेच्या खातेधारकांना पैसे वितरित करण्याची सुविधा उपलब्ध नाही. मार्च २0१७ मध्ये पोस्टाची बँकिंग सुविधा सुरू होणार आहे. त्यानंतरच ही सुविधा पोस्टाच्या एटीएममध्ये उपल्बध होईल, अशी माहिती मुख्य डाक घर अधिकार्यांनी दिली.
किमान आर्थिक गरजा भागविण्याइतपत सर्वसामान्य नागरिकांच्या खिशात पैसा पोहोचला आहे. शहरातील बहुतांश एटीएममधून ग्राहकांना नव्या दोन हजाराच्या नोटा वितरित केल्या जात आहेत, यामुळे गुरुवारी बँकांसमोरच गर्दी कमी होती. नव्या पाचशेच्या नोटा अद्याप रिझर्व्ह बँकेकडूनच आलेल्या नाहीत. आम्हीसुद्धा नव्या पाचशेच्या नोटांच्या प्रतीक्षेत आहोत. शनिवारपर्यंंंंत येतील, अशी शक्यता आहे, सोमवारपासून ग्राहकांना दिलासा मिळेल.
- अशोक शंभरकर, क्षेत्रीय महाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, अकोला.