मदतीच्या रकमेतून बँकांना करता येणार नाही वसुली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 11:54 AM2019-11-26T11:54:15+5:302019-11-26T11:54:45+5:30
मदतीच्या रकमेतून बँकांनी कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, असा आदेश १८ नोव्हेंबर रोजीच्या शासन निर्णयात देण्यात आला आहे.
- संतोष येलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील ३४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी पहिल्या शासनामार्फत २ हजार ५९ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. पीक नुकसान भरपाईच्या मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून, मदतीच्या रकमेतून बँकांनी कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, असा आदेश १८ नोव्हेंबर रोजीच्या शासन निर्णयात देण्यात आला आहे. त्यानुसार शेतकºयांच्या मदतीच्या रकमेतून बँकांना कोणत्याही प्रकारची वसुली करता येणार नाही.
पावसाळा संपल्यानंतर गेल्या महिनाभराच्या कालावधीत अवकाळी पावसाच्या तडाख्यात राज्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामध्ये खरीप पिकांसह बागायती आणि फळपिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. हाता-तोंडाशी आलेली पिके अवकाळी पावसाने पळविल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानुषंगाने गत १८ नोव्हेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार शेतकºयांसाठी पीक नुकसान भरपाईची मदत जाहीर करण्यात आली. त्यानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईची हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळपिकांच्या नुकसान भरपाईची हेक्टरी १८ हजार रुपये मदत शेतकºयांना देण्यात येणार आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी पहिल्या टप्प्यात २ हजार ५९ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपयांची रक्कम वितरित करण्यास शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. मदतीची रक्कम बाधित शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करून मदतीच्या रकमेतून बँकांनी कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, त्यासाठी सहकार विभागाने आदेश निर्गमित करण्याचा आदेशही शासन निर्णयात देण्यात आला आहे. त्यामुळे पीक नुकसान भरपाईपोटी शेतकºयांच्या खात्यात जमा होणाºया मदतीच्या रकमेतून बँकांना कोणत्याही प्रकारची वसुली करता येणार नाही.
पहिल्या टप्प्यात वितरित अशी आहे मदतीची रक्कम!
राज्यात ३४ जिल्ह्यातील शेतकºयांसाठी पहिल्या टप्प्यात २ हजार ५९ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपये मदतीची रक्कम शासनामार्फत वितरित करण्यात आली आहे. त्यामध्ये अमरावती विभागात अकोला जिल्हा-७२ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपये, वाशिम जिल्हा -५६ कोटी ५१ लाख २० हजार रुपये, अमरावती जिल्हा -७२ कोटी ४० लाख ९३ हजार रुपये व यवतमाळ जिल्ह्यासाठी १०१ कोटी ९६ लाख ३३ हजार रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली आहे.