कीटकनाशकांचा बॅच, नोंदणी क्रमांक महत्त्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 02:07 AM2017-10-14T02:07:11+5:302017-10-14T02:07:43+5:30
जिल्ह्यासह विदर्भात कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होवून ३५ शेतकर्यांचा मृत्यू झाला तर ५00 चे वर शेतकर्यांना विषबाधा झाल्याने रूग्णालयात दाखल व्हावे लागले. त्यामूळे किटकनाशकांची खरेदी , साठवणूक, हाताळणी व फवारणी करतांना काळजी घेणे महत्वाचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यासह विदर्भात कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होवून ३५ शेतकर्यांचा मृत्यू झाला तर ५00 चे वर शेतकर्यांना विषबाधा झाल्याने रूग्णालयात दाखल व्हावे लागले. त्यामूळे किटकनाशकांची खरेदी , साठवणूक, हाताळणी व फवारणी करतांना काळजी घेणे महत्वाचे आहे.
अनोळखी किंवा विनापरवाना किटकनाशकांची खरेदी करू नये, परवानाधारक विक्रेत्याकडूनच कीटकनाशक खरेदी करावे. हंगामपूर्व कीटकनाशक खरेदी करून ठेवू नये. खरेदीपूर्व बॅच नंबर, केंद्रीय कीटकनाशक नोंदणी मंडळाचा क्रमांक, उत्पादन तारिख बघूनच खरेदी करावी. अंतिम तारिख संपलेली किंवा संपत असलेली कीटकनाशके खरेदी करू नयेत. पॅकिंगचे देखील काही नियम आहेत. व्यवस्थित पॅकिंग केलेली कीटकनाशके खरेदी करावीत, गळती होणार्या पॅकिंगची औषधी खरेदी करू नयेत.
राहत्या घरात कीटकनाशके ठेवू नयेत. दूर सुरक्षितस्थळी साठवणूक करावी. मुळचे पॅकिंग, वेष्टन ठेवावीत . इतर पॅकिंगध्ये कीटकनाशक ओतू नयेत.
घरी असलेल्या कीटकनाशके व तणनाशके यांची शेतकर्यांनी वेगवेगळी साठवणूक करावी व तेथे धोक्याची सुचना लिहून ठेवावी, लहान मुले पोहचू शकणार नाहीत, अशा ठिकाणी ठेवावेत. सूर्यप्रकाश, पावसाचे पाणी किंवा हवेच्या झुळूकीसी संबंध येणार नाही याची काळजी घ्यावी. वाहतूक करताना कीटकनाशके स्वतंत्र पिशवीत ठेवावीत. मोठय़ा प्रमाणार कीटकनाशक डोक्यावर, खांद्यावर अथवा पाठीवर घेवू नये, आदी सुचना कृषी विभागाने केल्या आहेत.
फवारणी करताना ही घ्यावी काळजी
पीकावर कीटकनाशकांची फवारणी शक्यतो सकाळच्या सत्रात वारे नसताना करावी. उष्ण, दमट व प्रखर उन्हामध्ये किटकनाशकाशी संपर्क आल्यास शरीरात विष भिनण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते. फवारणी करताना वारे वाहणार्या दिशेला तोंड करुन फवारणी करावी. वारे वाहण्याच्या विरुद्ध दिशेला तोंड करुन किटकनाशकांची फवारणी केल्यास फवारा शरीरावर पडून शरीरात विष भिनण्याची शक्यता असते. फवारणी करताना जवळपास अन्य संबंधित व्यक्ती अथवा जनावरांची उपस्थिती असू नये.ऑगेर्नोफॉस्फरस अथवा काबार्मेट अथवा क्लोरिन गटातील किटकनाशके (उदा. प्रोफॅनोफॉस, प्रोफॅनोफॉस + सायपरमेथ्रीन यांचे मिश्रण, मोनोक्रोटोफॉस, डायफेन्युरॉन, इत्यादी.) ही जहाल असल्याने त्यांच्या फवारणीच्यावेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.संरक्षण साहित्य वापरल्याशिवाय द्रावण तयार करु नये.हातमोजे,मास्क,अँप्रान ,पुर्ण पॅन्ट ,गॉगल वापरण्याच्या सुचना कृषी विभागाने शेतकर्यांना केल्या आहेत.