पुनश्च हरिओम...पण ‘हे राम’ म्हणण्याची वेळ नको!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 11:30 PM2020-06-07T23:30:30+5:302020-06-08T10:01:22+5:30
सोमवारपासून अॅनलॉकचा तिसरा टप्पाही सुरू होत आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात होईल; मात्र हे सर्व होत असताना कोरोनाचे संकट संपलेले नाही.
- राजेश शेगोकार
अकोला : लोकमान्य टिळकांनी तुरुंगातून सुटल्यावर इंग्रजांच्या विरोधात लढण्याचे शस्त्र पुन्हा हाती धरताना ‘पुनश्च हरिओम’ या शीर्षकाखाली अग्रलेख लिहून सुरुवात केली होती. त्यानंतर पुनश्च हरिओम या शब्दांना एका म्हणीचाच दर्जा प्राप्त झाला. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी तब्बल ७३ दिवस लॉकडाऊनमुळे आपल्या सर्वांच्या मुक्त स्वातंत्र्यावर निर्बंध आले व एकप्रकारे आपण सारे बंदिस्त झालो होतो. या बंदिवासातून सुटका करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनश्च हरिओम याच शब्दांचा पुनरुच्चार करून ‘अॅनलॉक’ ची प्रक्रिया सुरू झाली. सम-विषम पद्धतीने का होईना; पण बाजारपेठेतील दुकाने उघडली, बाजारपेठेत लगबगही वाढू लागली. सोमवारपासून अॅनलॉकचा तिसरा टप्पाही सुरू होत आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात होईल; मात्र हे सर्व होत असताना कोरोनाचे संकट संपलेले नाही. उलट ते वाढतेच असून, रविवारी संध्याकाळी अकोल्यातील रुग्णांची संख्या ही आठशेच्या उंबरठ्यावर पोहोचली. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष नको. पूर्ण काळजी घेऊनच अर्थचक्र रुळावर आणण्यासाठी सर्वांचीच साथ गरजेची आहे.
अकोल्यातील कोरोनाचे संकट हे वाढतेच आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृत्यूची संख्याही वाढतीच असून, अकोला हे विदर्भातील सर्वात चिंताजनक शहर असल्याची चिंता खुद्द आरोग्यमंत्र्यांनीच व्यक्त केली होती; त्यामुळे अॅनलॉकची प्रक्रिया पार पाडताना प्रशासनासोबतच सर्वच नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. बाजारपेठेत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होणे मोठे जिकिरीचे आहे. त्यामुळे दुकानदारांनी केलेल्या व्यवस्थेला ग्राहकांनीही सहकार्य केले तर थेट संपर्क टाळता येणे शक्य आहे. पी १, पी २ नुसार दुकाने उघडण्याचा नियम काटेकोर पाळल्या गेला तर बाजारपेठेतील गर्दी तशीच अर्ध्यावर येऊ शकते त्यामुळे या नियमांचे पालन करूनच अकोल्याच्या अर्थचक्राला गती मिळेल. अन्यथा नियमभंग झाल्यास प्रशासनाला पुन्हा एकदा कठोर निर्णय घ्यावाच लागेल. सोबतच कोरोनालाही अधिक गती मिळण्याची शक्यताही आहे. सध्याच अकोल्यातील रुग्णवाढीचा वेग हा विदर्भात सर्वाधिक आहे. आता दिवस पावसाळ्याचे आहेत, त्यामुळे नेहमीच्या साथीच्या आजारांनी प्रतिकारशक्ती कमी होण्याचा काळ सुरू झाला असून, हाच काळ कोरोनाला पोषक ठरू शकतो. त्यामुळे आरोग्य यंत्रणेनेही कोरोनाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे अपेक्षित आहे. खुद्द आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अकोल्यातील आरोग्य यंत्रणेची लक्तरे टांगल्या गेल्यावरही फारसा फरक पडल्याचे चित्र नाही. शहरात अनेक मंगल कार्यालये, हॉटेल्स असतानाही कोविड सेंटरसाठी शहराबाहेरच्या वसतिगृहाची निवड केली जात आहे. त्यामुळे तेथील सुविधांबाबत संदिग्ध रुग्णांची ओरड कायमच आहे. ज्या रुग्णांना डिस्चार्ज केले जात आहे त्यांच्याबाबतही प्रचंड संभ्रमाची स्थिती आहे. आरोग्य यंत्रणा नव्या नियमांवर बोट ठेवत रुग्णांना मुक्त करत आहे; मात्र त्यांच्या फेरतपासणीची कोणतीही व्यवस्था नाही, या रुग्णांना पुन्हा कुठलाही आजार झाला तर खासगी डॉक्टर त्या रुग्णाला थेट सर्वोपचारचा मार्ग दाखवितात, अशाही तक्रारी आहेत; पण त्यांची कोणीही दखल घेत नाही.
अॅनलॉकच्या प्रक्रियेत लोकांचा वाढता वावर पाहता आरोग्य यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. त्यामुळे आता तरी रुग्णांच्या व्यवस्थेबाबत अधिक सजग होण्याची आवश्यकता आहे. येणाऱ्या काळात कोरोनासोबतच राहावे लागणार आहे, ही मानसिकता आता तयार होत आहे. कोरोनाचे संकट कुठूनही येऊ शकते, याचे भान सर्वांनाच ठेवावे लागणार आहे. त्यामुळे पुनश्च हरिओम म्हणताना हे भान सुटता काम नये, अन्यथा सर्वांनाच कपाळावर हात मारून ‘हे राम’ म्हणण्याची वेळ येईल.