कृषी ऊर्जा पर्वाची सुरुवात; ५० शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 11:00 AM2021-03-06T11:00:27+5:302021-03-06T11:00:35+5:30
MSEDCL News ५० शेतकऱ्यांचा प्रातिनीधिक स्वरूपात सन्मानपत्र, कृषी ऊर्जा पर्वाची लोगो असलेली टि शर्ट आणि टोपी देऊन सत्कार करण्यात आला.
अकोला : वीज जोडणी बाबतचे शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने व त्वरित सोडविण्यासाठी तसेच कृषी पंपाच्या थकबाकीतून मोठा दिलासा देत शेतकऱ्यांना थेट ६६ टक्क्यांची सवलत देण्याच्या उद्देशाने महावितरणने आयोजित केलेल्या कृषी ऊर्जा पर्वाची सुरुवात अकोला परिमंडळात झाली आहे. यानिमित्ताने जिल्हयातील थकबाकीमुक्त झालेल्या ५० शेतकऱ्यांचा प्रातिनीधिक स्वरूपात सन्मानपत्र, कृषी ऊर्जा पर्वाची लोगो असलेली टि शर्ट आणि टोपी देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या हस्ते ''कृषी ऊर्जा पर्वाच्या'' बॅनरचे उद्घाटन करण्यात आले.
राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची थकबाकीतून ६६ टक्क्यांची माफी देत थकबाकी कोरी करून देणे. सहाशे मीटरच्या आत असलेल्या कृषी पंपांना लघूदाब व उच्चदाब वाहिनीव्दारे वीज जोडणी देणे , ६०० मीटर पेक्षा जास्त अंतर असलेल्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाव्दारे वीज जोडणी देण्याच्या उद्देशाने महाकृषी ऊर्जा अभियान राज्यात सर्वत्र राबविले जात आहे.
व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल तसेच औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉक्टर नरेश गीते, नागपुर विभागाचे प्रादेशीक संचालक सुहास रंगारी यांच्या निर्देशानुसार १ मार्च ते १४ एप्रिल या ४५ दिवसांच्या कालावधीत विविध उपाययोजनांच्या माध्यमातून ''कृषी ऊर्जा पर्व'' संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. या पर्वात शेतकऱ्यांना त्वरीत नविन वीज जोडणी,सौर कृषी वाहिनीव्दारे दिवसा वीज पुरवठा,कृषी ग्राहकांना थकबाकीत ६६ टक्क्यापर्यंत असलेली सुट,कृषी ग्राहकांकरिता पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण,ग्रामपंचायतींचा सहभाग व सक्षमीकरण आदीबाबत विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. विद्युत भवन येथे १० थकबाकीमुक्त झालेल्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.