अकोला : शेतकरी शेतात दिवसभर काम करतात. रात्री वन्यप्राणी पिकांची नासाडी करून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या परिश्रमावर पाणी फेरल्या जाते. या वन्य प्राण्यांपासून पिकांचा बचाव होण्यासाठी रुस्तमाबाद येथील शेतकरी गजानन निलखण यांनी कल्पकतेतून शेतकरी घंटी यंत्र बनविले आहे. केवळ नावापुरता हे यंत्र न बनविता, अशी आठ हजार यंत्रे स्वत: तयार करून राज्यभरातील शेतकऱ्यांना विकली आहे. या जुगाडमुळे शेतकऱ्याला रोजगारही मिळाला आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील रुस्तमाबाद येथील शेतकरी निलखण यांनी खासगी कंपनीतील काम सोडल्यानंतर गावी परतले. तेथे त्यांनी शेती करायला सुरुवात केली. शेतात मूग पेरल्याने त्यांच्या वडिलांनी या पिकांचे वन्यप्राणी नुकसान करत असल्याचे सांगितले. निलखण यांचे आयटीआय झाले होते. त्यामुळे त्यांनी पत्र्याचे विविध पंखे तयार केले. या जुगाडातून त्यांना घंटी यंत्र बनविण्यात यश आले. सुरुवातीला हे यंत्र त्यांनी स्वत:च्या शेतात लावले. या यंत्रामुळे वन्यप्राणी व पाखरे पिकांपासून दूर राहत असल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. त्यामुळे गावकऱ्यांनीही हे यंत्र बनवून देण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांनी गावकऱ्यांना व नातेवाइकांना हे यंत्र बनवून दिले. यंत्राला वाढती मागणी पाहता त्यांनी हे यंत्र बनविण्याचा स्वत:चा व्यवसाय सुरू केला. पाहता पाहता राज्यभरात या यंत्राची विक्री केली.
स्टार्टअप फेस्टमध्ये विशेष आकर्षण
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात काही वर्षांआधी स्टार्टअप फेस्टचे आयोजन केले होते. यामध्ये ६० स्टार्टअप प्रयोगांचे प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये हे घंटी यंत्र विशेष आकर्षण होते. यामध्ये ५ स्टार्टअपमध्ये या यंत्राची निवड झाली. येथूनच शेतकरी निलखण यांच्या व्यवसायाला चालना मिळाली.
राज्याबाहेरही यंत्राची विक्री
शेतकऱ्यांने या यंत्राचा अकोल्यासह वाशीम, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, जिंतूर, सातारा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात पुरवठा केला आहे. सोबतच मध्य प्रदेशातील इंदोर येथेही ही यंत्रे दिली आहे.
घंटी यंत्राला खर्च कमी लागत असून देखभालीचा खर्च येत नाही. त्यामुळेही चांगली मागणी आहे. कृषी विद्यापीठातही ही यंत्रे लावण्यात आली आहे.
- गजानन निलखण, शेतकरी