अकोला : ‘फेक फेसबुक’ अकाउंटवरून परिचयातील व्यक्तीच्या नावे फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून त्यानंतर मेसेंजरच्या माध्यमातून पैशांची मागणी करीत फसवणूक होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. यामध्ये जिल्ह्यातील पोलीस व राजकीय पदाधिका-यांनादेखील मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे सावध राहा. फेक फेसबुकवरून पैशांची मागणी झाल्यास सायबर पोलिसांकडे तक्रार करा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.
एकमेकांशी संपर्क साधण्याचे साधन म्हणून सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. फेसबुकच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींशी मैत्री करण्याकडेही अनेकांचा कल असतो. मात्र, ही मैत्री कधी-कधी खूप महागात पडते तसेच मेसेंजर हॅक करून त्या मेसेंजर युझरच्या अकाउंटवरून पैशांची मागणीही केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. मध्यंतरी कॉंग्रेसचे युवा नेते कपिल रावदेव यांचेदेखील मेसेंजर हॅक करून हॅकरने मित्रांकडे पैशांची मागणी केली होती. याप्रमाणेच इतरही काही प्रकरणे समोर आली आहेत. फेसबुकवरून पैशांची मागणी करून फसवणुकीचे प्रकार समोर येत असल्याने सर्वांनी सावध होणे आवश्यक ठरत आहे. फेक प्रोफाइल बनवूनदेखील पैशांची मागणी होऊ शकते. तेव्हा फेसबुक, मेसेंजरचा वापर करताना अधिक सावध राहणे गरजेचे आहे. शक्यतोवर अनोळखी व्यक्तींची फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारू नये किंवा एखाद्या मित्राचे मेसेंजर हॅक झाले आणि त्यावरून पैशांच्या मागणीचा संदेश आला तर सर्वप्रथम संबंधित मित्राशी फोनद्वारे संपर्क साधून पडताळणी करावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.
फेक अकाउंट बनवून फसवणूक !
फेक अकाउंट बनवून फसवणूक करण्याचे प्रकारही घडतात. तेव्हा अधिक सावध राहणे आवश्यक आहे. ज्यांनी फेसबुक प्रोफाइल फेक बनवले आहे, त्यांनी आपल्या स्वत:च्या फेसबुक अकाउंटवरून बनविलेले फेक प्रोफाइल शोधावे. ज्या मित्रांना प्रोफाइलवरून रिक्वेस्ट गेली, त्यांच्याकडून फेक प्रोफाइलची लिंक (यूआरएल) मागवून घ्या. त्या प्रोफाइलवर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील. त्या डॉटवर क्लिक करा. तुमच्यासमोर फाइंड सपोर्ट किंवा रिपोर्ट प्रोफाइल हे ऑप्शन येतील. त्यावर क्लिक करा. प्रिटेंडिंग टू बी सम वन हा पहिला ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. पुढे तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील. मीट अ फ्रेण्ड आणि सेलिब्रेटी. त्यावरील मीट अ फ्रेण्ड हे ऑप्शन सिलेक्ट करा आणि नेक्स्ट करा, फेक प्रोफाइल अकाउंट काही वेळाने बंद होईल.
अशी घ्या काळजी !
स्वत:ची फेसबुक फ्रेण्डलिस्ट अनोळखी व्यक्तीला दिसू नये, याकरिता सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी सेटिंगवर क्लिक करा. त्यानंतर हू कॅन युवर फ्रेण्डलिस्टवर जाऊन ओनली मी करा. स्वत:चा फेसबुक प्रोफाइल फोटो अनोळखी व्यक्तीने कॉपी किंवा डाउनलोड करू नये, याकरिता सेटिंगमध्ये जाऊन प्रोफाइल लॉगइनवर जाऊन लॉक युवर प्रोफाइल करा. अनोळखीने फ्रेण्ड रिक्वेस्ट करू नये, याकरिता सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी सेटिंगमधील फ्रेण्ड ऑफ फ्रेण्ड करावे. स्वत:चे फेसबुक अकाउंट सुरक्षित ठेवण्याकरिता सेटिंगमध्ये जाऊन सिक्युरिटी ॲण्ड लॉगइनवर क्लिक करून टू फॅक्टर अथेंटिकेशन करावे. फेसबुकवरील आपला मोबाइल क्रमांक दिसू नये, याकरिता सेटिंगमधील प्रायव्हसी सेटिंगवर क्लिक करून हू कॅन लूक यू अप युजिंग फोन नंबर यू प्रोव्हाइडवर जाऊन ओनली मी हे ऑप्शन क्लिक करावे. यामुळे फेसबुक अकाउंट सुरक्षित करता येईल.