वारकऱ्यांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:14 AM2020-12-09T04:14:09+5:302020-12-09T04:14:09+5:30
धार्मिक कार्यक्रमांसाठी नियम व अटी लागू करून किमान १०० भाविकांना परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी गणेश महाराज शेटे यांचे ...
धार्मिक कार्यक्रमांसाठी नियम व अटी लागू करून किमान १०० भाविकांना परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी गणेश महाराज शेटे यांचे २ डिसेंबरपासून अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे. मागणीसंदर्भात शासनाकडून अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आला नसल्याने, ९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारकरी भजन आंदोलन करणार आहेत. या भजन आंदोलनात विदर्भातील विविध जिल्ह्यांसह राज्यातील वारकरी, भाविक दिंड्यांसह सहभागी होणार असल्याचे गणेश महाराज शेटे यांनी सांगितले. यावेळी महादेव महाराज निमकांडे, विठ्ठल महाराज साबळे, राजू महाराज कोकाटे, ज्ञानेश्वर महाराज जावरकार, ज्ञानेश्वर महाराज नावकार, गणेश महाराज जायभाये, ज्ञानेश्वर महाराज पातोंड, श्रीधर महाराज तळोकार, विजय महाराज शेटे, सोपान महाराज उकर्डे, बाभूळकर महाराज, गणेश कळसकार, गजानन मोडक, विजय ढोरे, प्रशांत आकोते उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांसोबत ‘व्हीसी’व्दारे चर्चेचे
आश्वासन मिळेपर्यंत उपोषण मागे नाही!
मागणीसंदर्भात सात, आठ दिवसांत मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) चर्चा करण्याचे लेखी आश्वासन देण्यात यावे, यासंदर्भात जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे, असे गणेश महाराज शेटे यांनी सांगितले.
सरकार निर्दयी!
वारकऱ्यांची व्यथा सरकारने जाणून घेतली पाहिजे; परंतु तसे न करता वारकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणारे सरकार निर्दयी असल्याचा आरोप गोपाल महाराज शेटे यांनी केला. वारकरी संप्रदायाची किंमत सरकारला कळली नाही, हे सरकारचे दुर्दैव असल्याचेही त्यांनी सांगितले.
आ.नितीन देशमुख यांना
वेळ नाही; ही खेदाची बाब!
राज्यात सत्ता असलेल्या पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी वारकऱ्यांच्या उपोषण मंडपाला भेट द्यायला पाहिजे होती; मात्र वारकऱ्यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी त्यांना वेळ नाही, ही खेदाची बाब आहे, असा आरोपही गणेश महाराज शेटे यांनी केला.