भीमा कोरेगाव घटनेचे अकोला जिल्ह्यातही पडसाद; आकोट, लोहाऱ्यात बसची तोडफोड, अकोल्यात बाजारपेठ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:25 PM2018-01-02T13:25:50+5:302018-01-02T13:43:01+5:30
अकोला: पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त सोमवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे तीव्र प्रतिसाद मंगळवारी अकोला जिल्ह्यातही उमटले.
अकोला: पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त सोमवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे तीव्र प्रतिसाद मंगळवारी अकोला जिल्ह्यातही उमटले. संतप्त युवकांनी अकोला शहरातून मोर्चा काढून शहरातील बाजारपेठा बंद करण्याचा प्रयत्न केला. तर आकोट व लोहारा येथे काही युवकांनी बसची तोडफोड केली. दरम्यान, सर्व ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
भीमा कोरेगाव येथे सोमवारी दोन गटात झालेल्या वादावरून दगडफेक झाली होती. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. अकोला शहरात काही युवकांनी सातव चौक, जठारपेठ, राऊतवाडी, लहान उमरी, रतनलाल प्लॉट चौक, केडीया प्लॉट, नवीन कपडा बाजार परिसरातून मोर्चा काढला व बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, जिल्ह्यातील संवेदनशिल असलेल्या बाळापूर तालुक्यातील लोहारा येथे काही युवकांनी परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक केली. यामध्ये चार प्रवाशी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिसांनी लोहारा येथे धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
अकोट येथे संतप्त युवकांनी अंजनगाव रोड नाक्याजवळ अकोला- परतवाडा बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या. बसमधील प्रवासी सुरक्षीत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, तेल्हारा तालुक्यातील दापुरा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तेल्हाºयात युवकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून निवेदन सादर केले. बाळापूर येथेही पोलिस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध करीत अकोल्यातील संतप्त युवकांनी शहरातून मोर्चा काढला. सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर तेथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी शेकडो युवकांची उपस्थिती होती. युवकांच्या निदर्शनांनी परिसर दणाणून गेला होता.