अकोला : महापालिकेतील कामचुकार व दांडीबहाद्दर कर्मचाºयांसह शिक्षक व सफाई कर्मचाºयांना वेसण घालण्यासाठी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी बुधवारी ‘बायोमेट्रिक मशीन’ची निविदा मंजूर करीत कार्यादेश जारी केले. आयुक्तांच्या प्रभावी निर्णयामुळे दांडीबहाद्दर कर्मचाºयांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्यावर वेतन कपातीच्या कारवाईची शक्यता वाढली आहे.महापालिकेचे मुख्यालय असो वा झोन कार्यालयांमधील विभाग प्रमुख तसेच कर्मचारी प्रशासकीय कामाची सबब पुढे करून कामावरून पळ काढत असल्याची बाब मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या निदर्शनास आली. झोन कार्यालयांवर नियुक्त केलेले कर्मचारी तसेच सकाळी शहरात दैनंदिन साफसफाई करणारे सफाई कर्मचारी कर्तव्यापासून पळ काढत असल्याच्या तक्रारींत वाढ झाली आहे. अशा दांडीबहाद्दर कर्मचाºयांचा बंदोबस्त करण्यासाठी मनपा आयुक्तांनी झोन कार्यालयांमध्ये हजेरीसाठी अत्याधुनिक ‘बायोमेट्रिक’ मशीन लावण्याचा निर्णय घेत निविदा प्रकाशित केली. यामध्ये विविध कंपन्यांचे अर्ज प्राप्त झाले असता,झेनॉन प्रायव्हेट लिमीटेड कंपनी पुणे यांची निविदा मंजूर करण्यात आली. ८५ मशीनसाठी मनपा आयुक्त वाघ यांनी कंपनीला कार्यादेश दिले आहेत.