बर्ड फ्लू हा पक्ष्यांचा रोग आहे, मानवाचा नव्हे - डॉ.पातुरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 10:30 AM2021-01-16T10:30:43+5:302021-01-16T10:31:01+5:30
Bird flu बर्ड फ्लू हा पक्ष्यांचा रोग असून, मानवाचा नाही, असे मत प्रा. डॉ. आशिष पातुरकर यांनी व्यक्त केले.
अकोला : सध्या बर्ड फ्लूबाबत कुक्कुटपालकांमध्ये आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, ज्या विषाणूच्या संसर्गाने सध्या कोंबड्यांमध्ये काही ठिकाणी बर्ड फ्लू झाल्याचे दिसून येत आहे, तो विषाणू मानवास सर्वसामान्यपणे रोगबाधित करत नसल्याने काळजीचे कारण नाही. मूलतः बर्ड फ्लू हा पक्ष्यांचा रोग असून, मानवाचा नाही, असे मत प्रा.डॉ.आशिष पातुरकर, कुलगुरू, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांनी व्यक्त केले. ते स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला यांचे वतीने ‘बर्ड फ्लू आहे तरी काय, वस्तुस्थिती आणि शंका निरसन’ या विषयावर आयोजित ऑनलाइन व्याख्यानाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या प्रसंगी डॉ.धनजंय परकाळे, मा. अतिरिक्त आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य, प्रा.डॉ.विलास आहेर, संचालक विस्तार शिक्षण, माफसू, नागपूर यांचेसह व्याख्याते प्रा.डॉ.नितिन कुरकुरे, संशोधन संचालक, माफसू, नागपूर; प्रा.डॉ.अजित रानडे, सहयोगी अधिष्ठाता, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई डॉ.अनिल भिकाने सहयोगी अधिष्ठाता, तसेच नॉलेज पार्टनर आलेम्बिक फार्मा लिमिटेड यांच्या वतीने उपस्थित पी.करुणानिधी, सीनियर व्हाइस प्रेसिडेंट, ऑनलाइन उपस्थित होते. बर्ड फ्लूचा समाज माध्यमावर होत असलेल्या अपप्रचारास आणि भूलथापांस सामान्य नागरिकांनी बळी पडू नये, म्हणून लोकप्रबोधनाच्या हेतुने सदर व्याख्यानाचे आयोजन केल्याचे कार्यक्रम संयोजक डॉ.भिकाने यांनी आपल्या प्रास्ताविकात नमूद केले.
व्याख्याते डॉ.कुरकुरे, डॉ.रानडे यांनी नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत त्यांचे शंका निरसन केले. कार्यक्रम समन्वयक प्रा.डॉ. सुनील वाघमारे, सूत्रसंचलन केले, तर प्रा.डॉ.सतीश मनवर यांनी आभार प्रदर्शन केले. सदर ऑनलाइन व्याख्यानासाठी सहसमन्वयक म्हणून डॉ. किशोर पजई, डॉ.मंगेश वडे यांच्यासह डॉ.गिरीश पंचभाई, डॉ.प्रवीण बनकर व डॉ.संतोष शिंदे यांनी परिश्रम घेतले.