लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्य शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या प्रति लीटर दुधामागे १० रुपये अनुदान तसेच दूध भुकटीसाठी ५० रुपयांचे अनुदान देण्यासह वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीने जुने शहरातील डाबकी रोड भागात शनिवारी रात्री आंदोलन केले. कोरोना विषाणूमुळे संचारबंदी लागू असतानाही भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर एकत्र येत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे दर वाढवून देण्याची मागणी करीत भाजपच्या वतीने १ आॅगस्टच्या पूर्वसंध्येला आंदोलन छेडण्यात आले. शनिवारी परजिल्ह्यातून शहरात दूध घेऊन दाखल होणाºया वाहनांना अडविण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते रात्री रस्त्यावर उतरले. लॉकडाऊन कालावधीतील वीज बिल माफ करण्याची मागणी करीत भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. डाबकी रोड भागात भाजपाच्या लोकप्रतिनिधींसह, मनपा पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलीस बनले मूकदर्शकसंसर्गजन्य कोरोना विषाणूच्या काळात घोळक्याने एकत्र येण्यास मनाई असताना संवेदनशील समजल्या जाणाºया डाबकी रोड परिसरात भाजपचे कार्यकर्ते जमा होत असल्याची बाब डाबकी रोड पोलीसांनी दुर्लक्षीत केली. ते या आंदोलनाच्या वेळी मात्र मूकदर्शक बनल्याचे दिसून आले. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाºयांनी आंदोलकांवर कारवाईची मागणी केली.