- राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी अकोल्यात सर्वच विद्यमान आमदारांना आशीर्वाद मागताना शिवसेनेचा साधा उल्लेखही केला नव्हता. त्यामुळे भाजप स्वबळावर तयारी करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. दुसरीकडे युतीमधील जागा वाटपाबाबत दोन्ही पक्ष सकारात्मक असले तरी शिवसेनेनेही आपली सज्जता ठेवल्याचेही समोर आले आहे. या पृष्ठभूमीवर भाजपाने सर्वच मतदारसंघांत स्वबळाची चाचपणी सुरू केली असून, सोमवार, २ सप्टेंबर रोजी इच्छुकांच्या मुलाखती होत आहेत. भाजपचे पक्ष निरीक्षक ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे २ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांशी व्यक्तिगत स्तरावर चर्चा करणार आहेत. या मुलाखती दरम्यान कोणत्याही इच्छुक उमेदवाराने शिष्टमंडळ किंवा शक्तिप्रदर्शन करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.अकोल्यात पाच विधानसभा मतदारसंघ असून, त्यापैकी चार मतदारसंघांत भाजपाचे आमदार आहेत. या चारही मतदारसंघांत आमदारांना स्पर्धक असले तरी उमेदवारीच्या बाबतीत विद्यमान आमदार ‘सेफ’ मानले जात आहेत. अकोला पूर्व व पश्चिम या दोन्ही विधानसभा मतदारसंघांवर केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांचे विशेष लक्ष असून, महापालिका क्षेत्रातील या मतदारसंघांनी महापालिका निवडणुकीत भाजपाच्या पारड्यात भरभरून मतदान केल्याने भाजपची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली आहे. अकोला पूर्वमध्ये डॉ. अशोक ओळंबे, आशिष पवित्रकार यांना इच्छुक मानले जाते.तर पश्चिममध्ये आमदार गोवर्धन शर्मा यांनी सतत पाचव्यांदा विजय मिळवित विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी यावेळीही निश्चित मानली जात आहे; मात्र आ. शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘हमारा कुछ खरा नही’, असे म्हटल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.या मतदारसंघात महापौर विजय अग्रवाल, हरिष अलिमचंदानी, अॅड. मोतिसिंह मोहता, डॉ. योगेश साहू यांची नावे चर्चेत आहे.आ. शर्मा यांचे पक्षातील वजन लक्षात घेता इच्छुक जाहीरपणे उमेदवारीची स्पर्धा रंगवित नसले तरी वरिष्ठांपर्यंत आपली इच्छा कशी पोहोचेल, याचा प्रयत्न करताना दिसतात. मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपाचे आमदार हरीश पिंपळे यांना पक्षांतर्गतच स्पर्धा निर्माण झाली आहे. अकोला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रावण इंगळे यांना भाजपमध्ये सन्मानाने प्रवेश देऊन पिंपळे यांच्यासाठी पक्षानेच अंतर्गत स्पर्धक निर्माण केल्याची चर्चा आहे. अकोटमध्ये आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याविरोधात भाजपमधील एक गट सक्रिय झाला असून, स्थानिक उमेदवार द्या, अशी मागणी रेटून धरली आहे. यासंदर्भात मतदारसंघात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बैठका घेऊन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना निवेदन देऊन स्थानिक उमेदवाराचा आग्रह धरला आहे. या मतदारसंघात राजेश नागमते, जयश्री पुंडकर, पुरुषोत्तम चौखंडे, संतोष झुनझुनवाला, राजेंद्र पुंडकर यांची नावे इच्छुकांच्या यादीत आहे.
शिवसेनेसह शिवसंग्रामचाही दावाएकीकडे भाजप-शिवसेनेचे वरच्या फळीतील नेत्यांमध्ये युतीचे ‘नक्की ठरल्याचे’ सांगत असले तरी भाजपाच्या कोट्यातील जागांवर शिवसेनेसह शिवसंग्रामचाही दावा प्रभावी होत आहे. शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रा काढून शिवसेनेचा दावा असलेल्या मूर्तिजापूर व बाळापूर या मतदारसंघांतच सर्वाधिक वेळ दिल्याने किमान दोन मतदारसंघ शिवसेना पदरात पाडून घेईल, अशी चर्चा आहे. यापैकी बाळापूर मतदारसंघावर शिवसंग्रामचाही दावा आहे. येथे खुद्द भाजपा जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांचाच दावा असल्याने ही जागा भाजपासाठी प्रतिष्ठेची आहे. या पृष्ठभूमिवर मित्रपक्षांना सांभाळण्यासह आपल्याच पक्षातील इच्छुकांनाही समजवावे लागणार आहे. या दोन मतदारसंघांत भाजपचे कोणते दावेदार मुलाखतींना हजर राहतात, हे पाहणे रंजक ठरेल.जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांसाठी मुलाखती होणार आहे. पक्ष म्हणून आमची बांधणी जिल्हाभरात आहे. याचा फायदा युतीला होणार आहे. जागा वाटपाचा निर्णय झाल्यानंतर पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे कार्यकर्ते सज्ज होतील.- तेजराव थोरातजिल्हाध्यक्ष, भाजपा