लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भाजपाने निवडणुकीतच वेगळ्य़ा विदर्भाच्या मुद्यांवर मते मागितली. त्यावर जनतेने ४४ आमदार निवडून दिले. भाजपच्या सत्तेला तीन वर्ष उलटली तरीही त्याबाबत कोणत्याच हालचाली दिसत नाहीत. आता मुख्यमंत्र्यांसह भाजपनेच वेगळ्य़ा विदर्भाबद्दलची भूमिका तातडीने जाहीर करावी, शिवसेनेने मोठय़ा मनाने दोन मराठी भाषिक राज्य होत असल्यास पाठिंबा द्यावा, तरीही विरोध असल्यास केंद्रातील भाजपाने बहुमताने विदर्भ राज्याची निर्मिती करायला हवी, असा पुनरुच्चार भाजपाचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी अकोला येथे केला. शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवणे, बेरोजगारांचे स्थलांतरण थांबवण्यासाठी विदर्भातील ६२ विधानसभा मतदारसंघात ७ ते १३ फेब्रुवारीदरम्यान विदर्भ आत्मबळ यात्रेच्या नियोजनानुसार मुंडगाव येथे बायजाबाई यात्रेनिमित्त त्यांनी भेट देत जनतेशी संवाद साधला. त्यानंतर विश्रामगृहात पत्रकारांना त्यांनी माहिती दिली. शेतकर्यांना उत्पादन खर्चावर ५0 टक्के नफा देऊन हमीभाव द्यावा, कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देऊन शेतकर्यांच्या उत्पादनाला भाव मिळेल, अशी तरतूद येत्या अर्थसंकल्पात करावी, या प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास भाजपाचा आमदार राहायचे की नाही, याबाबत सर्व पर्याय खुले आहेत. भाजपने निवडणूक लढताना वेगळ्य़ा विदर्भाचा मुद्दा रेटला होता. आता पुढील निवडणूक तोंडावर असताना भाजपाने वेगळ्य़ा विदर्भाबाबत भूमिका जाहीर करावी, असे डॉ. देशमुख म्हणाले. सत्तेला तीन वर्ष उलटल्यानंतरही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत. रोजगार निर्मिती झाली नाही. त्यामुळे गडचिरोलीसारख्या जिल्हय़ात तरुण नक्षलवादाकडे वळत आहेत. मुख्यमंत्री, कृषिमंत्री, ऊर्जामंत्री विदर्भाचे असताना कोणत्याही क्षेत्रात विकास झाल्याचे उदाहरण नाही. ते काम करीत आहेत; मात्र परिणामकारकता कुठेच नसल्याचेही डॉ. देशमुख म्हणाले. शासकीय यंत्रणेवर सरकारचा वचक नाही, यंत्रणा मुजोर झाली आहे. शासनच्या कामकाजाबद्दल लोकप्रतिनिधींसोबतच लोकांमध्येही रोष आहे, तो आता बाहेर पडत आहे. त्यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. यावेळी रिपाइं (आठवले) महानगर अध्यक्ष गजानन कांबळे उपस्थित होते.
सरकारकडून विकासाचा केवळ गाजावाजाजो विकास शेवटच्या घटकांपर्यंत पोचत नाही, त्याचा लाभ त्याला मिळत नाही. तोपर्यंत विकास झाला असे म्हणता येत नाही. सरकार भलत्याच मुद्यांवर विकास झाल्याचे सांगत असून शेतकरी, तरूणांना विकासाच्या कोणत्याही उपक्रमाचा लाभ झालेला दिसत नाही त्याचवेळी केवळ विकासाच्या प्रचंड गाजावाजा केला जात आहे. या प्रकाराला विकास म्हणयचे का? असा प्रश्न उपस्थित करून यावर सरकारनेच विचार करावा असा घरचा अहेर आ.देशमुख यांनी सरकारला दिला.