भाजप नगरसेविकेच्या दिराने केला शौचालय बांधकामात घोळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 01:52 AM2017-11-10T01:52:30+5:302017-11-10T01:54:31+5:30
अकोला : हातामध्ये सत्ता आल्यानंतर काहीही करता येते, अशा आविर्भावात वावरणार्या भाजप नगरसेवकांच्या नातेवाइकांनी मनपा प्रशासनाच्या नाकीनऊ आणले आहेत. पूर्व झोनमधील भाजपच्या एका प्रतिष्ठित नगरसेविकेच्या दिराने वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामात घोळ केल्याचे धक्कादायक प्रकरण उजेडात आले आहे.
आशिष गावंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : हातामध्ये सत्ता आल्यानंतर काहीही करता येते, अशा आविर्भावात वावरणार्या भाजप नगरसेवकांच्या नातेवाइकांनी मनपा प्रशासनाच्या नाकीनऊ आणले आहेत. पूर्व झोनमधील भाजपच्या एका प्रतिष्ठित नगरसेविकेच्या दिराने वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामात घोळ केल्याचे धक्कादायक प्रकरण उजेडात आले आहे. याप्रकरणी महापालिका कारवाई करण्याच्या तयारीत असतानाच भीतीपोटी अमोल नामक दिराने चूक कबूल केली. असे असले तरी लोकप्रतिनिधी व पदाधिकार्यांच्या माध्यमातून प्रशासनावर दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची माहिती आहे. एकूण प्रकार पाहता प्रशासन निष्पक्षपणे कारवाई करणार का, यावरच संभ्रम निर्माण झाला आहे.
ज्या नागरिकांच्या घरी वैयक्तिक शौचालय नसेल, त्यांचा शोध घेऊन त्यांना शौचालय उभारून देण्याचे राज्य शासनाचे महापालिकेला निर्देश आहेत. या कामाची जबाबदारी प्रशासनाने क्षेत्रीय अधिकारी व आरोग्य निरीक्षकांवर सोपवली आहे. मार्च महिन्यात मनपाची सत्तासूत्रे स्वीकारणारे भाजपातील काही नगरसेवक व त्यांच्या नातेवाइकांनी स्वत:च कंत्राटदार होणे पसंत केले. यापूर्वी ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या माध्यमातून राजकारण करणार्या काही नगरसेवकांनी मनपाच्या आवारात पाऊल ठेवताच मनमानी कारभाराला सुरुवात केल्याचे दिसून येते. यामध्ये पूर्व झोनमधील भाजपच्या एका प्रतिष्ठित नगरसेविकेच्या दिराने कहरच केला. मित्राच्या नावाने असलेल्या बँक खात्याचा वापर करीत ‘अमोल’ नामक दिराने कंत्राटदाराची भूमिका पार पाडत प्रभागात वैयक्तिक शौचालयांची उभारणी केली. हातामध्ये सत्ता असली म्हणजे ‘सब कुछ हो सकता है’च्या आविर्भावात मनपात वावरणार्या या दिराने प्रभागातील नागरिकांची दिशाभूल करीत एक-दोन नव्हे, तर चक्क २२ शौचालयांचे बांधकाम कागदोपत्री दाखवून ३ लाख ३0 हजार रुपये लाटण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराची प्रशासनाला कुणकुण लागल्यानंतर कारवाई व बदनामीच्या भीतीपोटी नगरसेविकेच्या नातेवाइकांनी ‘अमोल’ला चूक क बूल करण्यास भाग पाडले. प्रकरण निस्तरण्याचे सर्व उपाय केल्यानंतर आता मात्र संबंधित दिराने उचल खाल्ली असून, प्रशासनावर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच नगरसेवकांमार्फत दबावतंत्राचा वापर सुरू केल्याची माहिती आहे.
..तर यांच्यावरही करावी लागेल कारवाई
कागदोपत्री शौचालय दाखवून मनपाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मनपा प्रशासनाने कारवाईचे हत्यार उपसल्यास भाजप नगरसेविकेच्या दिरासोबतच पूर्व झोनचे क्षेत्रीय अधिकारी, प्रभागात नियुक्त केलेला आरोग्य निरीक्षक, पात्र ठरलेले लाभार्थी व कंत्राटदारावर गंडांतर येईल. त्यामुळे महापालिका आयुक्त अजय लहाने कारवाई करणार की चौकशी करून अहवाल गुलदस्त्यात ठेवणार, याबद्दल अकोलेकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.