अकोला : रेल्वेचे नियम अटी आणि शर्थीच्या अधीन राहून रेल्वे तिकीट विक्रीच्या ‘आयआरसीटीसी’चे अधिकृत तिकीट विक्री केंद्र दिलेल्या राधे टुर्स आणि ट्रॅव्हल्सचा संचालक प्रकाश अग्रवाल याने या नियमांना पायदळी तुडवित आॅनलाइन तिकीट विक्रीमध्ये प्रचंड काळाबाजार केल्याचे रेल्वे पोलिसांनी सुरू केलेल्या तपासात समोर येत आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या प्रकाश अग्रवाल याला न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती आहे.रेल्वेचे अधिकृत एजंट असल्याचा फायदा घेत रेल्वे तिकिटावर अधिक नफा कमविण्याच्या उद्देशाने राधे टुर्स आणि ट्रॅव्हल्सचा संचालक प्रकाश अग्रवाल याने अवैध मार्गाने आॅनलाइन तिकीट मिळवून त्याची जास्तीच्या दराने विक्री करीत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. यामध्ये रेल्वेच्या अटी व शर्थींचे अग्रवाल भंग करीत असल्याचेही समोर आले होते. अग्रवाल हा पर्सनल आयडीचा गैरवापर करून रेल्वेच्या आॅनलाइन तिकिटामध्ये प्रचंड हेराफेरी करीत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे विशेष नगर यांना मिळाल्यानंतर त्यांनी छापा टाकला. या छाप्यात प्रकाश अग्रवालच्या या कार्यालयातून ई-तिकीट, बँक खाते पुस्तके, संगणक खरेदीसाठी अवैध तसेच जास्त रक्कम लावलेले ५ लाख ९ हजार रुपयांची ई-तिकिटे अवैधपणे खरेदी केल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी लॅपटॉप आणि कागदपत्रे जप्त केली असून, या आॅनलाइन तिकिटांच्या तांत्रिक बाबींचा तपास करण्यात येत आहे. आरोपी एजंट प्रकाश अग्रवालविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधे टुर्स आणि ट्रॅव्हल्सचा संचालक प्रकाश अग्रवाल हा आॅनलाइन तिकिटांमध्ये हेराफेरी करीत असल्याचे समोर आले आहे. त्याने अनेक ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे वसूल केल्याचीही तक्रार आहे. त्यामुळे छापा टाकून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यात येत असून, तांत्रिक मुद्दे स्पष्ट झाल्यानंतर आॅनलाइन तिकीट विक्रीत घोळ करणाऱ्या साखळीवरच कारवाई करण्यात येणार आहे.विशेष नगर,पोलीस निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल, अकोला.