अल्पवयीन मुलीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढून शवविच्छेदन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 01:12 PM2019-05-06T13:12:50+5:302019-05-06T13:13:08+5:30
बाळापूर : शहरातील वेस भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने दोन महिन्यांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना न ...
बाळापूर: शहरातील वेस भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने दोन महिन्यांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना न कळविता मुलीवर परस्पर अंत्यसंस्कार उरकून टाकले; परंतु पोलिसात तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी रविवारी अल्पवयीन मुलीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला आणि जागेवर मृतदेहाचे शवविच्छेदन केले.
बाळापूर शहरातील १७ वर्षीय मुलीने ९ मार्च रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती; परंतु बदनामीपोटी कुटुंबीयांनी तिचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे भासविले आणि पोलिसांना माहिती न देता, तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार आटोपले. २0 मार्च रोजी बाळापूर पोलिसांनी निनावी तक्रार प्राप्त झाली. त्या तक्रारीत मुलीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करून मुलीचा मृत्यू नैसर्गिक झाला नसून, तिने आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर २४ मार्च रोजी इलियास अहमद अब्दुल सादिक कुरेशी यांनीसुद्धा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करून चौकशी केली होती; परंतु पोलिसांनी कोणतीच कारवाई न केल्यामुळे संतप्त झालेल्या काही नागरिकांनी उर्दू विद्यालयात साहित्याची तोडफोड केली होती. मुख्याध्यापकाने त्याची तक्रार दिल्यानंतर प्रकरणाने वळण घेतले. एका नागरिकाने मुलीच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या शिक्षकाविरुद्ध बाळापूर पोलीस कारवाई करीत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. त्यामुळे बाळापूर पोलिसांनी तपास सुरू करून मृतक मुलीचे वडील, नातेवाईक, प्रत्यक्षदर्शी, अंत्यसंस्कारात सहभागी लोकांचे जबाब नोंदविले असता, सर्वांनी मुलीचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे सांगितले आहे. दरम्यान, २८ एप्रिल रोजी नागपूर उच्च न्यायालयातील दोन न्यायाधीशांच्या बेंचने अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचे तथ्य बाहेर येण्यासाठी तिचा मृतदेह कबरीतून बाहेर काढण्याचा आदेश पोलिसांना दिला. त्यानुसार बाळापूर उपविभागीय अधिकारी रमेश पवार यांनी ३0 एप्रिल रोजीच मृतदेह कबरीतून बाहेर काढण्याचा आदेश दिला होता. प्रकरण हाताबाहेर जात असल्याने दोन महिन्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांनी १ एप्रिल रोजी पोलीस स्टेशन बाळापूर येथे अकस्मात मृत्यूची नोंद केली आणि रविवारी ५ मे रोजी अल्पवयीन मुलीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला आणि डॉ. सचिन गाडगे, डॉ. कुलकर्णी, निवासी नायब तहसीलदार कोठेकर व सरकारी पंचासमक्ष मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन केले. शवविच्छेदन अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)
शवविच्छेदन अहवालानुसार होणार कारवाई
मुलीने आत्महत्या केली की तिचा मृत्यू नैसर्गिक झाला, हे शवविच्छेदन अहवालातून समोर येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे शवविच्छेदनाचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यानुसार न्यायालय काय निर्देश देते, यावर पोलिसांची कारवाई अवलंबून राहील.
स्मशानभूमी परिसरात कडेकोट बंदोबस्त
पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता. बाळापूर शहरात प्रथमच कबरीमधून मृतदेह बाहेर काढून जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. त्यामुळे परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावला होता.