अकोला: डांबरच्या बॉयलर टँकला वेल्डिंग करत असताना अचानक टँकचा स्फोट झाला. यामध्ये दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर चार मजूर गंभीर जखमी झाले. जखमी मजुरांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी सायंकाळी ६.६० वाजताच्या सुमारास रिधोरा जवळील ईगल इन्फ्रा कंपनीच्या प्लांटमध्ये घडली. प्राप्त माहितीनुसार, डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिधोरा जवळील ईगल इन्फ्रा कंपनीच्या प्लांट आहे. या ठिकाणी रस्त्याच्या निर्माण कार्याशी निगडित साहित्य निर्मिती केली जाते. बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सहा वेल्डर डांबरने भरलेल्या बॉयलर टँकला वेल्डिंग करण्याचे काम करत होते. वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे बॉयलर टँकचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या स्फोटामध्ये पारस येथील रहिवासी आतिफ खान रहीम खान आणि संजय पवार या दोन्ही मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तसेच पारस येथील रहिवासी शेख मुशीर ऊर्फ बुश शेख मुफीद (२२), राजू रामराव पवार, रामेश्वर रैदास, साकिब हुसैन आदी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या दलाला आगीवर नियंत्रण आणण्यात यश मिळाले. यावेळी बाळापूर उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, पटवारी प्रशांत बुले, जुने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सेवानंत वानखडे, डाबकी रोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिरीष खंडारे यांच्यासह पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला.
अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच अकोला अग्निशमन दलाचे तीन बंब व दोन टँकर घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले.
घटनास्थळी काही काळ तणावाची स्थिती
घटनेतील मृतक आसिफ खान हा पारस येथील रहिवासी आहे. घटनेची माहिती मिळताच मृतकाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. या कंपनीचा व्यवस्थापक किंवा कंत्राटदाराला इथे बोलवा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, अशी भूमिका घेत काही काळ तणावाची स्थिती निर्माण
सामाजिक कार्यकर्ते धावले मदतीला
घटनेनंतर गंभीर जखमींवर वेळत उपचार व्हावा, या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ता पराग गवई यांच्यासह संकेत सिरसाट, नीलेश वोराठे यांनी पुढाकार घेत शर्तीचे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नानंतर रुग्णांवर सर्वोपचार रुग्णालयात तत्काळ उपचारास सुरुवात झाली.