अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात शाळा बंद असल्याने म्हैसांग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी ‘बोलकी शाळा, बाेलके गाव’ उपक्रम सुरू करून, त्याव्दारे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात आले.
१६ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांनी म्हैसांग येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शाळेने सुरू केलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी घेतली. विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकेचे वाटप यावेळी करण्यात आले. तसेच कोरोना काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शाळेने सुरू केलेल्या ‘बोलकी शाळा, बाेलके गाव’ या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमात अभ्याक्रमातील विविध विषयांचे माहितीचे फलक गावातील भिंतीवर लावून, त्याव्दारे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम शाळेच्या शिक्षकांनी सुरू केले. कोरोना काळात शाळा बंद असल्याने, विद्यार्थ्यांना देण्यासाठी शाळेच्या शिक्षकांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे यावेळी काैतुक करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सोळंके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गावंडे, ग्रामपंचायत प्रशासक डाॅ. महल्ले, शाळेतील शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.