बैलांना आंघोळ घालण्यासाठी गेलेला मुलगा डोहात बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 03:09 PM2019-08-30T15:09:31+5:302019-08-30T15:09:42+5:30
१५ वर्षीय मुलाचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना तेल्हारा तालुक्यातील तळेगाव (डवला)येथे शुक्रवार, ३० आॅगस्ट रोजी सकाळी घडली.
तेल्हारा (अकोला) : पोळा सणानिमित्त बैलांना आंघोळ घालण्यासाठी विद्रुपा नदीवर घेऊन गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना तेल्हारा तालुक्यातील तळेगाव (डवला)येथे शुक्रवार, ३० आॅगस्ट रोजी सकाळी घडली. शाम देवानंद तायडे असे या मुलाचे नाव असून, त्याच्या आकस्किम मृत्यूने पोळ्याच्या दिवशी गावावर शोककळा पसरली आहे.
इयत्ता नववीत शिकणारा शाम तायडे हा शुक्रवारी सकाळी त्याच्या मित्रांसोबत बैलांना आंघोळ घालण्यासाठी गावा शेजारी वाहत असलेल्या विद्रुपा नदीवर गेला होता. बैलांना आंघोळ घालत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने शाम तायडे नदीच्या डोहात गटांगळ्या खाऊ लागला. मित्रांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश आले नाही. शाम डोहात बुडाल्याची वार्ता पसरताच ग्रामस्थांनी नदीकाठावर गर्दी केली होती. शामचा मृतदेह नदीतून काढण्यात आल्यानंतर तो उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.