अकोला: रमाई आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शासनाकडून निधी उपलब्ध नसल्याने, जिल्ह्यात १८ हजार घरकुलांच्या कामांना 'ब्रेक' लागला आहे. त्यामुळे रखडलेल्या घरकुलांच्या कामांसाठी शासनाकडून अनुदानाची रक्कम केव्हा प्राप्त होणार, याबाबतची प्रतीक्षा जिल्ह्यातील लाभार्थीकडून करण्यात येत आहे.रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी प्रत्येकी १ लाख २० हजार रुपये अनुदान दिले जाते; परंतु रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकामांसाठी गत जानेवारीपासून शासनाकडून निधी उपलब्ध झाला नाही, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकामांसाठी लाभार्थींना अनुदान वितरित करण्यासाठी शासनाकडून गत महिनाभरापासून निधी उपलब्ध नसल्याने जिल्ह्यात दोन्ही योजनेंतर्गत १८ हजार घरकुलांची कामे रखडली आहेत. त्यामध्ये रमाई आवास योजनेंतर्गत ८ हजार घरकुलांची कामे आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १० हजार घरकुलांची कामे रखडली आहेत. निधीअभावी घरकुलांची कामे रखडल्याने, घरकुल बांधकामासाठी अनुदानाचा निधी शासनाकडून केव्हा प्राप्त होणार, याबाबत जिल्ह्यातील घरकुल लाभार्थींकडून प्रतीक्षा केली जात आहे.अनुदानासाठी लाभार्थींवर चकरा मारण्याची वेळ!रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेत घरकुल बांधकामांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने, घरकुलांची कामे रखडली आहेत. त्यामुळे घरकुल बांधकामांसाठी अनुदानाच्या रकमेकरिता जिल्ह्यातील घरकुल लाभार्थींवर पंचायत समितीमध्ये चकरा मारण्याची वेळ आली आहे.जिल्हा परिषद कृषी सभापतींनी घेतली माहिती!घरकुल बांधकामांचे अनुदान मिळाले नसल्याने घरकुलांची कामे रखडल्याने जिल्ह्यातील लाभार्थींकडून तक्रारी होत असल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांनी बुधवारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात भेट देऊन, जिल्ह्यातील घरकुल बांधकामांची माहिती घेतली. दोन्ही योजनेंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याने, रखडलेल्या घरकुल कामांचा आढावा त्यांनी घेतला, तसेच घरकुल कामांसाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही कृषी सभापतींनी केली.