अकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागातील मध्यवर्ती बसस्थानकासाठी ब्रेक डाउन व्हॅन दाखल झाली आहे. त्यामुळे आता एसटीला अपघात होताच युद्धपातळीवर सदर व्हॅन दुरुस्तीसाठी पोहोचणार आहे.राज्यात धावणाऱ्या बसगाडीला अपघात झाला तर त्या गाडीला जवळच्या डेपो आणावी लागत असे. जर गाडी आणण्यायोग्य नसेल तर घटनास्थळावर जाऊन दुरुस्तीचे काम करावे लागत होते. त्यानंतर इतर कामकाजासाठी ही गाडी जवळच्या विभागीय कार्यशाळेत पाठविली जायची. यासाठी प्रत्येक बसगाडीत एक टूल कीट असायची. अपघाती घटनेच्या वेळी ही टूल किट काढून बसगाडी दुरुस्तीचे पर्याय खुले असायचे; मात्र बसगाडीतील बिघाड चालक-वाहकाच्या आटोक्यातील नसेल तर बसगाडी दुरुस्तीची जबाबदारी इतरांवर सोपविली जायची. यासाठी कायमस्वरूपी पर्याय शोधल्या जात असताना ब्रेक डाउन व्हॅनची संकल्पना पुढे आली. राज्याचे परिवहन मंत्री यांनी राज्यातील प्रत्येक आगारास ब्रेक डाउन व्हॅन पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली असून, राज्यातील प्रत्येक आगारासाठी ब्रेक डाउन व्हॅन सक्रिय होत आहे. या व्हॅनमध्ये सर्व सुविधायुक्त साधणे आणि उपकरणे असून, यासाठी विशेष टीम नियुक्त झाली आहे. अकोला मध्यवर्ती बसस्थानक क्रमांक १ साठी एमएच ०६, ईयू ९२४६ क्रमांकाची व्हॅन कार्यरत राहणार आहे. राज्यातील २४० डेपोसाठी लवकरच अशा प्रकारच्या ब्रेक डाउन व्हॅन सेवा देणार आहे.