तीर्थक्षेत्र विकास, जनसुविधेच्या कामांना ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 02:33 PM2019-12-08T14:33:57+5:302019-12-08T14:34:02+5:30
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर निधी खर्चाच्या ताळमेळासाठी ही कामे थांबविली जात असल्याचे पत्र ४ डिसेंबर रोजी देण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मोठ्या व लहान ग्रामपंचायतींनी विकास कामांसाठी अनुदान तसेच तीर्थक्षेत्र विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून चालू वर्षात वाटप केलेल्या चार कोटींच्या निधीपैकी अनेक कामांचे कार्यारंभ न दिल्याने त्या कामांचा खर्च थांबविण्यात आला आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांची माहिती अद्यापही न आल्याने एकूण किती निधीची कामे थांबणार आहेत, हे येत्या दोन-तीन दिवसांत स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर निधी खर्चाच्या ताळमेळासाठी ही कामे थांबविली जात असल्याचे पत्र ४ डिसेंबर रोजी देण्यात आले आहे.
मोठ्या व लहान ग्रामपंचायतींच्या जनसुविधा, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात चार कोटींचा निधी पंचायत समिती स्तरावर वाटप केला. तो देताना ३१ मार्च २०२० पर्यंत कामे पूर्ण करून खर्च करण्याचे बजावण्यात आले. दरम्यान, विधानसभा निवडणूक पार पडली. राज्यात सत्तांतर झाले. त्याचवेळी महायुती शासनाच्या काळातील सर्वच कामांचा आढावा घेत श्वेतपत्रिका काढण्याचेही नव्या मुख्यमंत्र्यांनी ठरविले. त्यामुळे आता जी कामे सुरूच झाली नाही, ती थांबणार आहेत. त्या कामांची माहिती पंचायत विभागाने मागविली. त्यापैकी चार तालुक्यांची माहिती अप्राप्त आहे. माहिती आल्यानंतर कामे थांबविण्याचा आदेश पंचायत विभागाकडून दिला जाणार आहे.
जिल्हा वार्षिक योजनेतून जनसुविधा कामांच्या एक कोटी रुपये निधीचे वाटप जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना करण्यात आले. त्यामध्ये अकोला तालुक्यातील पाच गावे-२४ लाख, अकोट- पाच गावांमध्ये २४ लाख, बाळापूर- दोन गावांमध्ये १० लाख, मूर्तिजापूर- चार गावांमध्ये १९ लाख, तेल्हारा- तीन गावांमध्ये १९ लाख, पातूर-आलेगाव येथे चार लाख रुपये देण्यात आले.
लहान ग्रामपंचायतींमध्ये जनसुविधांसाठी दोन कोटी रुपये वाटप करण्यात आले. त्यामध्ये अकोला- २२ ग्रामपंचायतींना ६६ लाख, अकोट- १३ ग्रामपंचायतींना ३८ लाख, बाळापूर- चार ग्रामपंचायतींना १२ लाख, बार्शीटाकळी- ८ गावे- २४ लाख, तेल्हारा- ६ गावे-१८ लाख, मूर्तिजापूर- ८ गावे- २४ लाख, पातूर- ६ गावे - १८ लाख रुपये निधी वाटप करण्यात आले.
तीर्थक्षेत्र विकासासाठी १ कोटी
तीर्थक्षेत्र विकास कामांसाठी प्राप्त एक कोटी रुपयांतून अकोला तालुक्यात आठ संस्थानांसाठी ३७ लाख रुपये, अकोट तालुक्यातील तीन गावांत १८ लाख, बार्शीटाकळी-३ गावे- १० लाख, तेल्हारा- ४ गावे २० लाख, पातूर- २ गावे- सात लाख, मूर्तिजापूर- २ गावे- आठ लाखांचे वाटप करण्यात आले.