अकोला : देशभरात स्तन कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. महिलांमध्ये स्तन कर्करोगाविषयी जनजागृती व्हावी, या अनुषंगाने संपूर्ण देशभरात आॅक्टोबर महिना हा स्तन कर्करोग जनजागृतीचा महिना म्हणून पाळला जातो. राज्यातही याबाबत महिलांमध्ये जनजागृती केली जात आहे; परंतु ८० टक्क्यांपेक्षा जास्त महिलांना स्तन कर्करोग किंवा त्याच्या लक्षणांबद्दल माहिती नसल्याचे कर्करोग तज्ज्ञांनी सांगितले आहे.स्तन कर्करोगाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे; मात्र संकोच किंवा मनातील भीतीमुळे बहुतांश महिला तपासणीसाठी पुढे येत नाहीत. दुर्दैवाने कर्करोग हा न दुखणारा असल्याने स्त्रिया त्याकडे दुर्लक्ष करतात. शिवाय संकोच, मनातील भीती आणि काळजीमुळे स्तन कर्करोगाची तपासणी करण्याऐवजी तो दडवून ठेवण्यात येतो; मात्र ही वृत्ती कालांतराने घातक ठरू लागते. कर्करोग वाढत जातो आणि शेवटी रुग्णाचा मृत्यू होतो. यावर नियंत्रणासाठी देशभरात आॅक्टोबर महिना स्तन कर्करोग जनजागृती महिना म्हणून पाळण्यात येतो. या अंतर्गत राज्यात गत महिनाभरापासून आरोग्य विभागांतर्गत स्तन कर्करोग अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमांदरम्यान जवळपास ८० टक्के महिलांना स्तन कर्करोगाविषयी माहिती नसल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले आहे.‘एनसीडी’अंतर्गत कर्करोग तपासणीराज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा तथा प्राथमिक आरोग्य केंद्रावर एनसीडी केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांतर्गत कर्क रोगासोबतच इतर नॉन कम्युनिकेबल डिसीजची प्राथमिक तपासणी केली जाते. आॅक्टोबर महिन्यात एनसीडी केंद्रामध्ये कर्करोगाची तपासणी करण्यात आली.अशी ओळखा लक्षणे
- स्तनात किंवा बगलेत गाठ, स्तन काळे किंवा लालसर होणे
- स्तनाचा आकार बदलणे
- स्तनाची त्वचा आत ओढली जाणे
- स्तनाला खाज सुटणे
- १५ दिवसांपेक्षा स्तनाची जखम भरली न जाणे
- स्तनातून पाणी किंवा रक्तस्त्राव होणे
बहुतांश स्त्रिया स्तन कर्करोगाच्या तपासणीसाठी पुढे येत नाहीत. त्यांच्या मनातील भीती कमी करण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना स्वत:च स्तन कर्करोगाची तपासणी करता यावी, या दृष्टिकोनातून एनसीडी केंद्रांतर्गत वर्षभर तपासणी केली जाते. स्तन कर्करोग जनजागृतीसाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहेच; परंतु महिलांनीही तपासणीसाठी पुढे येण्याची गरज आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.