बाश्रीटाकळी: सर्व शिक्षा अभियानांतर्गत केलेल्या कामाचे मानधन काढण्यासाठी तीन हजारांची लाच मागणारे गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत पस्तापुरे सहिसलामत निसटले असले तरी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत तालुक्यातील अंध व अपंग विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येतात. या कार्यक्रमाचे बिल अनुदान तत्त्वावर काढणे व मंजुरीचे अधिकार गटशिक्षणाधिकारी यांना आहेत. येथील अंध शिक्षक संजय मुळे यांनी कार्यक्रमाचे बिल सादर केले असता बिल मंजूर करण्यासाठी पस्तापुरे यांनी तीन हजार मागितले. गुरुवार, २६ जून रोजी पैसे स्वीकारण्याचे ठरले होते. संजय मुळे यांनी या प्रकरणाची माहिती लाचलुचपत विभागाला दिली. यानंतर येथे सापळा रचण्यात आला; परंतु पैसे स्वीकारण्याच्या आधीच संशय आल्याने पस्तापुरे कार्यालयाबाहेर निघून गेले. यामुळे लाचलुचपत विभागाने लावलेला सापळा फसला. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पस्तापुरे घटनेनंतर पसार झालेत.
लाचलुचपत विभागाचा सापळा फसला
By admin | Published: June 27, 2014 1:21 AM