अकोला : रुग्णसंख्या वाढत असताना सर्वोपचार रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी होत आहे. त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. अपघात कक्षात गत दोन दिवसांपासून मेडिसीन विभागात वैद्यकीय अधिकारी (एमओ) नसल्याने त्यांची संपूर्ण जबाबदारी एकट्या सीएमओवर येत असल्याचे वास्तव आहे.सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र त्या तुलनेत आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नाही. विशेषत: डॉक्टरांचा विचार केल्यास एमबीबीएस डॉक्टरांऐवजी येथील रुग्णसेवा इटर्न डॉक्टरांवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत आहे त्या डॉक्टरांनी राजीनामे दिल्यास परिस्थिती किती बिकट होईल, याचा अंदाज मागील दोन दिवसांपासून सर्वोपचार रुग्णालयात पाहावयास मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेतनाअभावी अपघात कक्षातील मेडिसीन विभागातील काही डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून येथील अपघात कक्षातील रुग्णसेवेची संपूर्ण जबाबदारी एकट्या सीएमओवर येत आहे. याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होताना दिसत आहे.गरज १५ डॉक्टरांची; उपस्थित दोनचसर्वोपचार रुग्णालयातील अपघात कक्षात पाच युनिट असून, प्रत्येक युनिटमध्ये किमान पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे; परंतु मागील दोन दिवसांपासून केवळ दोन ते तीनच वैद्यकीय अधिकाºयांची हजेरी राहत असल्याचे दिसून येत आहे.डॉक्टरांच्या संपापासूनच परिस्थिती झाली निर्माणकाही दिवसांपूर्वी वेतनासाठी इंटर्न डॉक्टरांसह वरिष्ठ व कनिष्ठ निवासी डॉक्टरांनी आंदोलनाचा पवित्रा उचलला होता. त्यानंतर वेतन देणार असल्याचे आश्वासन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातर्फे देण्यात आले होते. त्यामुळे डॉक्टरांनी संप मागे घेत रुग्णसेवा सुरू केली; परंतु काही दिवसातच परिस्थिती पुन्हा पूर्वीसारखीच झाल्याने डॉक्टर राजीनामा देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच परिस्थितीमुळे नवीन डॉक्टरही येण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.डॉक्टरांनी राजीनामे दिले नाहीत. सर्वोपचार रुग्णालयातील परिस्थिती सुरळीत आहे. सीएमओ आणि इंटर्नस कडेच अपघात कक्षाची संपूर्ण जबाबदारी आहे.- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.