गव्हाच्या काड्या पेटविणे ठरू शकते धोकादायक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:17 AM2021-04-17T04:17:22+5:302021-04-17T04:17:22+5:30
वणवा पेटण्याची शक्यता: कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज लोकमत न्यूज नेटवर्क संतोषकुमार गवई पातूर : गव्हाची काढणी केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या ...
वणवा पेटण्याची शक्यता: कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
संतोषकुमार गवई
पातूर : गव्हाची काढणी केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या काड्या शेतकरी पेटवून देतात. अशा प्रकारे गव्हाचे शेत पेटविणे धोकादायक ठरू शकते. एखाद्या वेळी जंगलात वणवा पेटण्याची शक्यता असते. त्यामुळे गव्हाच्या काड्यांची विल्हेवाट कशी लावावी, याबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू पिकाची लागवड करतात. यावर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्याने सिंचनाची उत्तम व्यवस्था होती. यामुळे गव्हाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली. सध्या बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील गव्हाची काढणी झाली आहे. यामुळे काढणीनंतर शिल्लक राहिलेल्या काड्या शेतकऱ्यांकडून पेटवून देण्यात येतात. या काड्यांमध्ये सिलीकॉन, नत्र, स्फुरद, पालाश हे जमिनीसाठी लाभदायी असलेले घटक असतात. यामुळे जमिनीचा पोत सुधारून शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होते.
मात्र याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून योग्य ते मार्गदर्शन करण्यात येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून या काड्या जाळण्यात येत असल्याने शेतजमिनीचा दर्जा खालावतो. त्यामुळे उत्पादकतेवर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांनी गव्हाच्या काड्या न जाळता त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. काड्या न जाळता तशीच नांगरणी केल्यास काड्या सडून त्यामध्ये असलेले खताचे घटक जमिनीत मिसळून जमिनीचे पोषण होईल. या पद्धतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना याचा सकारात्मक परिणाम यानंतरच्या पिकाच्या उत्पादनातून दिसून येईल, यात शंका नाही.
----------------------------------
तालुक्यात आगीच्या घटना वाढल्या!
तालुक्यात जंगलातील आगीच्या घटना वाढल्या आहेत. गत महिनाभरात तीन ते चार आगीच्या घटना घडल्या आहेत. गव्हाच्या कांड्या पेटविल्याने आग वाढल्यास जंगलात वणवा पेटू शकतो. त्यामुळे कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.
-------------------------------------
काड्यांमधील घटकांमुळे सुधारतो पोत
गव्हाची काढणी झाल्यानंतर गव्हाच्या काड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी ‘एस-९ कल्चर’ची फवारणी करावी. यामुळे गव्हाच्या काड्या लवकर कुजून त्यातील महत्त्वपूर्ण घटक जमिनीला मिळण्यास मदत होते. यामुळे शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब केल्यास जमिनीचा पोत निश्चितपणे सुधारेल.
----------------------------
कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन करण्यात येते. कृषी साहाय्यकांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. गव्हाच्या काड्या न जाळता त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यास सांगण्यात येते.
- धनंजय शेटे, तालुका कृषी अधिकारी, पातूर.