अकोला : कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी ‘युवाराष्ट्र’ ने कंबर कसली असून विदर्भ, मराठवाड्यातील कापूस उत्पादक पट्ट्यात धडक मोहिमेला लवकरच प्रारंभ करीत आहे. बळीराजाचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस या नगदी पिकाचे नुकसान टाळण्यासाठी या मोहिमेंतर्गत शर्थीचे प्रयत्न करणार असल्याचे ‘युवाराष्ट्र’चे डॉ. नीलेश पाटील व विलास ताथोड यांनी प्रसिद्धीस दिले आहे.कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या हंगामात राज्यातील कापसाच्या ४३ टक्के एवढी मोठी घट आली होती. उत्पादनातील या घटीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसह शेतमजूर, जिनिंग,प्रेसिंग,व्हीविंग,गारमेंट्स व ट्रान्सपोर्ट आदी उद्योगांना व त्यावर अवलंबून असलेल्या कामगारांनाही मोठा फटका सहन करावा लागला. या पृष्ठभूमीवर ‘युवाराष्ट्र’चे पदाधिकारी गेल्या काही महिन्यांपासून गुलाबी बोंडअळीच्या प्रश्नांवर काम करीत असून, कृषी विद्यापीठाचे अधिकारी व संशोधकांच्या बरोबरीने गुलाबी बोंडअळीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी प्रशिक्षण प्राप्त करून घेतले आहे. प्रत्येक जिल्ह्यांत किमान दोन रथ,१० तज्ज्ञांची टिम, प्रोजेकटर्स, स्लाईड शो,एकात्मिक नियंत्रणासाठी मार्गदर्शक साहित्य व तज्ज्ञांचे मार्गदर्शन, ना नफा ना तोटा तत्त्वावर कामगंध सापळ्यांची उपलब्धता, बोंडअळीची लागण, नुकसान पातळी, एकात्मिक नियोजन,कीटकनाशके याबाबत सविस्तर मार्गदर्शन व उपाययोजना या उपक्रमांतर्गत रथरुपी गाड्यांद्वारे गावागावांत प्रत्येक शेतकºयांपर्यंत ‘युवाराष्ट्र’ पोहोचविणार आहे.