अकोला: कृषी विद्यापीठाची मातृसंस्था (एमसीईएआर) महाराष्टÑ राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष पदावरू न हरिभाऊ जावळे यांना काढण्यात आले आहे. हे पद कॅबिनेट मंत्री दर्जाचे आहे. तद्वतच महाराष्टÑ कृषी विद्यापीठ सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय मेहता यांच्यासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या कार्यकारी परिषदा, सेवा प्रवेश मंडळावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्याही रद्द करण्यात आल्या आहेत. ५ मार्च रोजी शासनाने हा आदेश काढला आहे.राज्यातील कृषी विद्यापीठांवर शासनाच्यावतीने कार्यकारी परिषद सदस्यांची निवड केलीे जाते. यामध्ये विद्यमान आमदारांसह प्रगतिशील शेतकऱ्यांचा समावेश केला जातो. तसेच सेवा प्रवेश मंडळावरही सदस्याची नियुक्ती केली जाते. गत युती शासनाच्या कार्यकाळात ही नियुक्ती करण्यात आली होती. या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.पुणे येथे मुख्यालय असलेल्या ‘एमसीईएआर’चे अध्यक्ष राज्याचे कृषी मंत्री असतात. उपाध्यक्षपदी शासनाकडून नियुक्ती दिली जाते. अलीकडच्या काही वर्षांपासून या पदाला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. याअगोदर केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे एमसीईएआरचे उपाध्यक्ष होते. ते केंद्रात मंत्री झाल्यानंतर हरिभाऊ जावळे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवरील जैनुद्दीन जेव्हेरी, गणेश कंडारकर, विनायक सरनाईक, मोरेश्वर वानखेडे, स्नेहा हरडे व डॉ. अर्चना बारब्दे यांची अशासकीय नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. तसेच परभणीच्या स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे लिंबाजी भोसले, अजय गव्हाणे, बालाजी देसाई, शरद हिवाळे, पवित्रा सुरवसे व डॉ. आदिती सारडा, राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे तुषार पवार, नाथाजी चौगुले, पंकजकुमार महाले, डॉ. विजयप्रकाश ठोंबरे, सुनीता पाटील, दत्तात्रय पानसरे, दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठातील प्रवीण देशमुख, डॉ. उदयसिंह पाटील, राजेश वानखडे व अर्चना पानसरे यांच्याही कार्यकारी परिषदेवरील अशासकीय सदस्य म्हणून असलेल्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.याव्यतिरिक्त ‘एमसीईएआर’वरील अशासकीय सदस्य तुषार पवार मोरेश्वर वानखडे, अर्चना पानसरे व अजय गव्हाणे तसेच कृषी शास्त्रज्ञ सुरेश थोरात यांच्याही नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
‘एमसीईएआर’च्या उपाध्यक्षांसह अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 2:33 PM