विजय शिंदे
अकोट: मुंबईत अमली पदार्थाचे रॅकेट उघडकीस येत असताना, अडगाव, बोरव्हा येथे पोलिसांनी छापा घालून तब्बल १४६ किलो गांजा जप्त केला होता. विशेष म्हणजे, गांजाची तस्करी करणारे आरोपी शौकिनांना चॉकलेट पाकिटातून गांजा उपलब्ध करून देत होते, असे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. गांजाची विक्री करणारा मुख्य सूत्रधार अद्यापही पोलिसांच्या कारवाईपासून दूर आहे.सातपुड्याच्या मार्गाचा अवैध व्यवसायाच्या तस्करीसाठी वापर होत आहे. रेल्वे लाइन बंद झाल्यानंतर अवैध व्यावसायिकांनी संग्रामपूर-टुनकी मार्गे विदर्भात अनेक ठिकाणी आपले एजंट नेमून गांजा तस्करीच्या व्यवसायाला बळ दिले. अमली पदार्थ तस्करी होत असल्याची माहिती फुटू नये, यासाठी चॉकलेटच्या पाकिटांच्या वापर करण्यात येत असे. चॉकलेटच्या पाकिटांमध्ये शौकिनांना गांजा पुरविण्यात येत असल्याची माहिती या प्रकरणामुळे समोर आली आहे. शिवाय बाहेरगावी गांजा नियोजित एजंटपर्यंत पोहोचवित असताना पोलिसांना संशय येऊ नये. हाच चॉकलेटच्या पाकिटाचा उद्देश आहे. गांजा तस्करी प्रकरणात अनेक जण गुंतले आहेत. त्यामुळे पोलिसांनी गांजा जप्त प्रकरणाची सखोल चौकशी करून यातील पाळेमुळे शोधून काढण्याची गरज आहे. गांजा साठवणुकीचे मुख्य ठिकाण म्हणून तेल्हारा तालुक्यातील बोरव्हा गावातील शत्रुघ्न भाऊलाल चव्हाण याचे घर होते. या घरातून ५२ पाकिटांमध्ये एकूण १ क्विंटल ४७ किलो गांजा २३ सप्टेंबर रोजी पोलिसांनी जप्त केला. याच बोरव्हा गावातून कैलास बाजीराव पवार (रा. वारी हनुमान, ता. तेल्हारा) याने १८ पाकिटात ३९ किलो गांजा आणला होता. हा गांजा अकोट तालुक्यातील अडगाव खुर्द येथे निंबाच्या झाडाखालील राजू मोतीराम सोळंके याच्या झोपडीत ठेवला होता. पोलिसांनी गांजासह विविध आकाराची चॉकलेटची पाकिटे जप्त केली. गांजा तस्करीचे जाळे बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर-टुनकी गावापर्यंत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.