- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: चित्रपटासृष्टीतील अत्यंत मानाचा समजला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. यंदा ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट बालकलावंताचा पुरस्कार नाळ चित्रपटातील चैत्याच्या भुमिकेसाठी श्रीनिवास पोफळे याला प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळयानंतर शुक्रवारी श्रीनिवास अकोल्यात दुसऱ्या आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवा निमित्त आला होता. याप्रसंगी लोकमतने श्रीनिवास सोबत मनमोकळा संवाद साधला. या संवादातील काही अंश लोकमत वाचकांसाठी खास.
प्रश्न: सर्वोत्कृष्ट बालकलावंताचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर तुला कसे वाटत आहे?उत्तर: खुप छान वाटले. पुरस्कार वितरण सोहळयात खुप कलाकार होते. उपराष्ट्रपती सरांनी (व्यंकय्या नायडू) यांनी खुप कौतूक केले. अभिनंदन करू न विदर्भातून एवढया दुरू न आला का, असे म्हंटले.
प्रश्न: आगामी कोणते चित्रपट करीत आहे?उत्तर: नाळ नंतर मेडली नावाचा चित्रपटात काम करीत आहे, ज्याचे शुटींग लंडनला झाले. राजकुमार नावाचा चित्रपट केला. आणखी एक तेलगु चित्रपट केला. दोन्ही चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
प्रश्न: चित्रपटात येण्याआधीचा श्रीनिवास आणि नाळ चित्रपटानंतरचा श्रीनिवास यात कसा फरक पडला आहे?उत्तर: मी अमरावतीच्या साक्षरा पॅराडाईज स्कुलमध्ये पाचवीत शिकतो. शुटींग सुरू होती तेव्हा मी दुसरीत होतो. शाळेमध्ये वेगळी ट्रिटमेंट नाही मिळत. होमवर्क करावाच लागतो. शाळेतील शिक्षिका गंमतीने म्हणतात की, ‘‘तुझ्या डायरेक्टरला सांग आम्हाला हिरोईनचा रोल दयायला. हिरोईनचा नाहीतर आजीचा रोल दिला तरी चालेल. ’’ नाळ चित्रपटानंतर मला पहिल्यासारखे बाहेर मित्रांसोबत खेळायला मिळत नाही. पतंग उडवायला आवडते. पण आता मला पतंग उडविता येत नाही. बाहेर निघालो की, लोक सेल्फी घेण्यासाठी गराडा घालतात.
प्रश्न: नागराज मंजुळे यांच्यासोबत शुटींग करतांनाचे अनुभव कसे आहेत?उत्तर: नागराज मंजुळे सर पहिले डॉयलॉग समजुन सांगायचे. कशी अॅक्टींग करायची शिकवायचे. नागराज मंजुळे संराचा स्वभाव खुप चांगला आहे. मला खुप आवडतात ते. चित्रपटाचा अन्य स्टाफ पण खुप चांगला होता. माझी काळजी घ्यायचा. खाण्या-पिण्याची काळजी घ्यायचा.
प्रश्न: चित्रपटांची शुटींग आणि अभ्यास यामध्ये कसा मेळ साधतो?उत्तर: शुटींगचे शेडयुल असले तर माझे पप्पा माझ्या शाळेत सुटीचा अर्ज देतात. शुटींग पूर्ण झाल्यानंतर शाळेत आल्यानंतर जो पण अभ्यास शिकविला असेल, ते शिक्षकांकडून समजवून घेतो. वर्गमित्रांकडून वहया घेवून अभ्यास पूर्ण करतो.