- आशिष गावंडे
अकाेला : मिनी बायपासलगतच्या नवीन किराणा बाजारात शिरलेल्या पुराच्या पाण्यामुळे व्यापाऱ्यांच्या ताेंडचे पाणी पळाले आहे. बाजारातील पाण्याचा निचरा हाेणारा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने बांधलेल्या नालीमुळे बंद झाला. पुराचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण हाेऊन ते दुकानांमध्ये शिरले. यामुळे ७० पेक्षा अधिक दुकानांमधील अन्नधान्याची नासाडी हाेऊन काजू, बादाम व कडधान्याला काेंब फुटले आहेत. सुमारे अडीच काेटींच्या धान्याची नासाडी झाली असताना इन्शुरन्स कंपन्यांकडून सर्व्हेसाठी टाळाटाळ केली जात आहे.
नवीन किराणा बाजारात पुराचे पाणी शिरल्याची माहिती सुरक्षा रक्षकाने देताच रात्री १ वाजेपर्यंत अनेक व्यापाऱ्यांनी बाजाराकडे धाव घेतली. परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बाजारात प्रवेश करता आला नाही. त्यामुळे मुसळधार पावसातही पाणावलेल्या डाेळ्यांनी दुकानांमधील अन्नधान्याची नासाडी पाहण्याची दुर्दैवी वेळ व्यापाऱ्यांवर ओढवली. अकाेला मर्चंट असाेसिएशनने बांधलेल्या नाल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने बांधलेल्या नालीमुळे बंद झाल्याचे पाहून व्यापाऱ्यांना धक्काच बसला. त्यामुळे पर्यायी नाल्यातील माती काढेपर्यंत दुकानांमधील काेट्यवधी रुपयांचे अन्नधान्य पाण्याने भिजले.
ड्रायफ्रूट, कडधान्यांना लागली बुरशी
किराणा बाजारातून ड्रायफ्रूट, कडधान्याची हाेलसेल विक्री हाेते. दुकानांत पाणी शिरल्याने लाखाे रुपयांचे ड्रायफ्रूट, कडधान्य व मसाल्याच्या पदार्थांची अक्षरश: वाट लागली. पूर ओसरल्यानंतर सहाव्या दिवशी काजू, बदाम, साेप व कडधान्यांस बुरशी लागल्याचे पहावयास मिळाले.
‘एनएचएआय’ने नाला केला बंद
मिनी बायपासच्या रुंदीकरणाच्या कामात सिमेंटचा नाला बांधण्यात आला. यामुळे बाजारातून निचरा हाेणारा नाला बंद झाला. हा नाला खुला करण्याची मागणी किराणा बाजारच्यावतीने ‘एनएचएआय’कडे एप्रिल महिन्यांत करण्यात आली हाेती, हे विशेष.
रात्री २ वाजता मनपाकडून जेसीबी
दुकानांमध्ये शिरलेले पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद असल्याचे पाहून असाेसिएशनचे काेषाध्यक्ष चंचल भाटी यांनी रात्री १ वाजता जेसीबीसाठी पश्चिम झाेनचे क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र टापरे यांच्यासाेबत संपर्क साधला. रात्री २ वाजता टापरे जेसीबी घेऊन आल्यानंतर पुराच्या पाण्याची वाट माेकळी करण्यात आली.
...तर इन्शुरन्स कंपनीविराेधात गुन्हा
बाजारात काेट्यवधी रुपयांच्या अन्नधान्याची नासाडी झाली. महसूल विभागाने पंचनामा केला असला तरी अद्यापही इन्शुरन्स कंपनीकडून सर्व्हेसाठी टाळाटाळ केली जात असल्याची बाब व्यापाऱ्यांनी सांगितली. अशा कंपन्यांविराेधात गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
साखर, चहापत्ती पाण्यात
पुराच्या पाण्याने सखल भागातील घरे, दुकानांना वेढा घातला. डाबकी राेडवरील सरस्वती किराणा शाॅपीमधील साखर, चहापत्ती, शेंगदाणे, साबुदाना आदींसह इतर धान्य तळमजल्यात साठवले हाेते. तळमजल्यात सर्व्हिस लाइनमधून पाणी शिरले. आणि सकाळ उजाडेपर्यंत या सर्व अन्नधान्याची नासाडी झाल्याची माहिती श्रीहरी रामकृष्ण लावडे यांनी दिली.
‘एनएचएआय’ने बांधलेल्या नाल्यामुळे बाजारातील पाण्याचा मार्ग बंद झाला. त्यामुळे पुराच्या पाण्याने दुकानातील गहू, तांदूळ, कडधान्य भिजले. २४५ कट्टे मालाची नासाडी हाेऊन माेठे आर्थिक नुकसान झाले.
-चंचल भाटी, काेषाध्यक्ष, अकाेला हाेलसेल मर्चंट असाेसिएशन
‘एनएचएआय’ने बाजाराच्या प्रवेशद्वारासमाेर माेठा नाला बांधताना बाजारातील नाल्याचा मार्ग बंद केला. हा मार्ग खुला ठेवला असता तर दुकानांमध्ये पाणी शिरले नसते. दुकानातील सुमारे १८ ते २० लाख रुपये किमतीचे कडधान्य भिजले. शासनाने किमान ५ लाखांची मदत करावी. याविषयी मर्चंट असाेसिएशन व विदर्भ चेंबरने पुढाकार घ्यावा.
-राजकुमार राजपाल, हाेलसेल व्यापारी