अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवन येथे ७१ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आल्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहीक वाचन करण्यात आले. अकोला परिमंडळातील महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, सुरक्षित, तत्पर आणि अखंडित सेवा देऊन राष्ट्र विकासाला अधिक गती देण्यासाठी काम करावे असे आवाहन मुख्य अभियंता अनिल डोये यांनी केले.यावेळी मुख्य अभियंता अनिल डोये तथा अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या हस्ते प्राविण्य प्राप्त २३ कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचा धनादेश व पुष्प देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी नागपुर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकाची मानकरी ठरलेली सहाय्यक अभियंता कोमल पुरोहीत तसेच रजत पदक प्राप्त शरद भोसले, तंत्रज्ञ किशोर धाबेकर, निम्नस्तर लिपिक हसनोद्दीन शेख, शिपाई शुभम मात्रे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन वरिष्ठ व्यवस्थापक शिवाजी तिकांडे यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमाला कार्यकारी अभियंते प्रदीप पुनसे, प्रशांत दाणी, गजेंद्र गडेकर, प्रणाली विश्लेषक राजेश दाभने, उपमुख्य औधोगिक संबंध अधिकारी विशाल पिपरेसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.