- संजय खांडेकर
अकोला: रॉयल्टी आणि वाहतुकीच्या अतिरिक्त खर्चावर बोट ठेवून सिमेंट कंपन्यांनी प्रति गोणीमागे २० रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ फेब्रुवारी २०२० पासून ही दरवाढ होण्याचे संकेत आहेत. एकाच महिन्यात दुसऱ्यांदा गोणीमागे ५० रुपयांची दरवाढ होत असल्याने बांधकाम व्यावसायिक हादरले आहेत.महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील सिमेंट कंपन्यांनी एकत्रित येऊन सिमेंटच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात तशी औपचारिक घोषणा झाली होती. मागील आठवड्यात सिमेंट कंपन्यांनी गोणीमागे २५ ते ३० रुपयांनी दरवाढदेखील केली; मात्र रॉयल्टी आणि वाहतुकीचा खर्च लक्षात घेता ही दरवाढ कमी असल्याचा सूर उमटला. त्यामुळे पुन्हा २० रुपयांनी सिमेंटच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही दरवाढ येत्या १ फेब्रुवारीपासून केली जाणार असून, त्यासंदर्भातील संदेश ठोक आणि किरकोळ विक्रेत्यांना पाठविले जात आहे. एकाच महिन्यात तब्बल ५० रुपयांनी सिमेंटमध्ये दरवाढ होत असल्याने राज्यात कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. असे आहेत सिमेंट विक्रीचे दरआंध्र प्रदेशातील सर्वात स्वस्त विकल्या जाणाºया सिमेंटच्या दरातही वाढ झाली आहे. आंध्रातील डेंकन, सागर, महागोल्ड, महाशक्ती जानेवारी महिन्याच्या पूर्वी २२० रुपये गोणीप्रमाणे आणि अंबुजा, अल्ट्राटेक कंपनीचे सिमेंट २७५ रुपये गोणीप्रमाणे विकल्या जात असे; मात्र जानेवारीनंतर आंध्रातील सिमेंट २५० रुपये गोणीप्रमाणे आणि अंबुजा, अल्ट्राटेकचे सिमेंट ३०० रुपये गोणीप्रमाणे झाले.दरवर्षी जानेवारी महिन्यात सिमेंट कंपन्यांकडून दरवाढ होते. बांधकाम व्यावयिकांपेक्षा शासन आणि सामान्य माणसांवर याचा परिणाम जास्त होतो; मात्र त्याकडे कुणी लक्ष देत नाही.- पंकज कोठारी, माजी राज्य उपाध्यक्ष, क्रेडाई.मंदीमुळे राज्यातील बांधकाम व्यावसायिक आधीच भरडला गेला आहे. त्यात लोखंड आणि सिमेंटमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शासनाने धोरण बदलून त्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे.- दिनेश ढगे, क्रेडाई, जिल्हाध्यक्ष, अकोला.