अकोला: उद्योग, व्यवसाय तसेच उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या नागरिकांना ‘पासपोर्ट’ (पारपत्र) काढण्यासाठी नागपूर येथील कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. पासपोर्ट प्राप्त करण्याची प्रक्रिया क्लिष्ट असली, तरी अकोला ते नागपूर प्रवासादरम्यान अनेकदा अपघात घडले आहेत. त्यामध्ये शहरातील मुस्लीम कुटुंबावर शोककळा पसरली होती. या सर्व बाबी लक्षात घेता जिल्ह्याच्या ठिकाणी पासपोर्ट कार्यालय व्हावे, यासाठी केंद्र शासनाकडे सतत पाठपुरावा केला. नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचे केंद्र शासनाचे धोरण असल्याने जिल्हावासीयांच्या सेवेत पासपोर्ट कार्यालय मंजूर करण्यात आल्याचे प्रतिपादन शुक्रवारी खासदार अॅड. संजय धोत्रे यांनी केले.शहरातील ताजनापेठ पोस्ट आॅफिस येथे खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते पासपोर्ट सुविधा केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर आ. गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, नागपूर येथील पासपोर्ट विभागाचे विभागीय अधिकारी सी. एल. गौतम, नोडल अधिकारी आर. शिवकुमार, डाक अधीक्षक विनोदकुमार सिंह, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, उपमहापौर वैशाली शेळके, जि.प.चे माजी अध्यक्ष श्रावण इंगळे, अशोक गुप्ता, अशोक डालमिया, गिरीश जोशी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिर उपस्थित होते. जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय व्हावे, ही फार जुनी मागणी होती. केंद्रात भाजपाचे सरकार येताच पासपोर्ट कार्यालयाची मागणी रेटून धरण्यात आल्याचे खा. संजय धोत्रे यांनी यावेळी सांगितले. संबंधित अधिकारी व कर्मचारी जनतेला चांगली सुविधा देतील, अशी अपेक्षा आहे. त्यासंदर्भात काही अडचणी असतील तर आम्हाला सांगा, समस्या निकाली काढणे आमची नैतिक जबाबदारी असल्याचे खा. धोत्रे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.काय म्हणाले, लोकप्रतिनिधी?पासपोर्टसाठी नागपूरकडे जाणाºया शहरातील मुस्लीम कुटुंबाचा अपघात होऊन त्यांच्या नातेवाइकांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली होती. तेव्हापासून पासपोर्ट कार्यालयासाठी खा. धोत्रे यांनी केंद्राकडे सतत पाठपुरावा केल्याचे आ. गोवर्धन शर्मा यांनी सांगितले. शहरात सुरू झालेल्या पासपोर्ट केंद्रामुळे जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाल्याचे सांगत आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी शासनाचे आभार मानले. पासपोर्टसाठी नागरिकांना नागपूर येथे अनेकदा चकरा माराव्या लागत होत्या. प्रवासात होणारा मानसिक व शारीरिक त्रास आजपासून संपुष्टात आल्याचे आ. रणधीर सावरकर यांनी स्पष्ट केले.
पाच जणांना दिले पासपोर्ट!पासपोर्ट लोकार्पण सोहळ्यात विजय बोबडे, सुनंदा बोबडे, शेख नूर शेख मुनीर, खैरून्नीसा शेख नूर, जहिराबी अब्दुल नजीर यांना खा. संजय धोत्रे व उपस्थितांच्या हस्ते पासपोर्टचे वितरण करण्यात आले.