अकोला: जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये खाटांची क्षमता ३०० वरून ५०० पर्यंत वाढविण्यास विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिली; परंतु अद्याप वाढीव पदांना मान्यता मिळाली नसल्याने जिल्हा परिषद सीईओ आयुष प्रसाद यांनी आरोग्य सेवा आयुक्तांकडे पत्रव्यवहार करून वाढीव पदनिर्मितीसह आवश्यक साहित्य खरेदी आणि अतिरिक्त निधीची मागणी केली.जिल्हा स्त्री रुग्णालयात गर्भवतींची वाढती संख्या लक्षात घेता खाटांची संख्या ३०० वरून ५०० वर करण्यास शासनाने मान्यता दिली. त्यानुसार इमारतीच्या बांधकामासाठी शासनाने २,१२९ लाख रुपये निधीला मंजुरी देत २५ मार्च २०१३ रोजी २०४३.८४ लाखांचा निधी वितरित केला होता; परंतु शासनाने दिलेले अंदाजपत्रक आणि प्रत्यक्षात बांधकामास आलेल्या खर्चामध्ये तफावत आली आहे. ही तफावत भरून काढण्यासाठी १४.३४ कोटी रुपयांची गरज आहे. विंग ए व विंग बी या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्यात असून, संपूर्ण बांधकामासाठी व फर्निचर, विद्युतीकरण इत्यादी कामे अद्याप पूर्ण व्हायची बाकी आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद सीईओ आयुष प्रसाद यांनी वाढीव पदभरतीसोबतच आवश्यक साहित्य आणि अतिरिक्त १४.३४ कोटी रुपयांच्या निधीची मागणी अरोग्य सेवा आयुक्तांकडे पत्रव्यवहाराद्वारे केली आहे.