अकोला : महसूल विभागामार्फत वितरीत करण्यात येणारे जात प्रमाणपत्रासह विविध दाखले आता जिल्ह्यातील नागरिकांना थेट ‘ई-मेल’वर मिळणार असून, त्यामुळे दाखल्यांसाठी नागरिकांचा जाणारा वेळ वाचणार असून, पैशाचीही बचत होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत दिली.यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात सेतू केंद्रांमार्फत दिले जाणारे जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला,रहिवासी दाखला, वय व अधिवास दाखला व इतर महसुली प्रमाणपत्र व दाखले आता अर्जदारांना थेट ‘ई-मेल’वर प्राप्त होणार आहेत. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील नागरिक आता ‘ई-मेल’वर थेट प्रमाणपत्र व दाखले प्राप्त करू शकतील. त्यामुळे प्रमाणपत्र व दाखले मिळविण्यासाठी सेतू केंद्र, तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयात वारंवार चकरा मारण्यासाठी नागरिकांचा जाणारा वेळ वाचणार असून, प्रमाणपत्र व दाखल्यांसाठी मध्यस्थांकडून होणारी पैशाची लूट थांबणार आहे. नागरिकांच्या पैशाचीही बचत होणार आहे.अकोला ‘एसडीओं’चा अभिनव प्रयोग!जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनात अकोला व बाळापूरचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी ‘ई-मेल’वर नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र व इतर दाखले उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला. हा उपक्रम जिल्ह्यात सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र व इतर दाखले थेट ‘ई-मेल’वर प्राप्त होऊ शकतील.