लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला: पातूर तालुक्यातील ग्राम भानोस येथे एका अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह पोलीस आणि महिला बालकल्याण अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी उधळून लावला. मुलीच्या आई व आजोबांना समज देऊन सोडून देण्यात आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक जी.एम. गुल्हाने यांना ग्राम भानोस येथे अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली.त्यांनी महिला बाल कल्याण जिल्हा अधिकारी योगेश जवादे, करुणा महंतारे यांच्या मार्गदर्शनाखालील बाल संरक्षण अधिकारी अश्विन डाबेराव, एम.एल. अहिर, एस.व्ही. घाटे, ग्रामसेवक हरीश गोळे, बिट अंमलदार एएसआय जायभाये, पथकाला घेऊन भानोस गाव गाठले. या ठिकाणी एका १७ वर्षीय मुलीसोबत २१ वर्षीय युवकासोबत लग्न लावण्याची तयारी सुरू असल्याचे दिसून आले.पोलिसांनी हा विवाह तातडीने थांबवित, मुलीच्या वयाचा दाखला मागविला.त्यात मुलगी अल्पवयीन असल्याचे दिसून आल्यावर मुलीच्या नातेवाइकांना १८ वर्षाच्या आत विवाह करणे कायद्याने गुन्हा असल्याचे मुलीच्या आई व आजोबांना ठणकावून सांगितले आणि समज देण्यात आली. पोलीस आणि बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे पातूर तालुक्यातील बालविवाह रोखण्यात पथकाला यश आले. (वार्ताहर)
पातूर तालुक्यात बालविवाह रोखला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:16 PM