लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि सिंचन सहयोग अकोलाच्यावतीने शनिवार, १८ जानेवारीपासून अकोल्यात दोन दिवसीय ‘सिंचन व पाण्याचा कार्यक्षम वापर’, या विषयावर २० वी महाराष्ट्र सिंचन परिषद आयोजित करण्यात आली आहे. या सिंचन परिषदेचे उद्घाटन शनिवारी सकाळी १० वाजता मानव संसाधन विकास केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते होणार आहे. परिषदेला राज्यातील पाणी तज्ज्ञ उपस्थित राहून पाण्यासंबंधी विविध विषयांवर मंथन होणार आहे.राज्याचे जलसंपदा, शालेय शिक्षण तथा कामगार राज्यमंत्री यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. विलास भाले भूषविणार असून, आंतरराष्ट्रीय जल सिंचन व जलनिस्सारण आयोगाचे माजी सहकार्यवाहक डॉ. माधवराव चितळे, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर, महाराष्ट्र सिंचन सहयोगाचे अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे, विदर्भ पाटबंधारे विकासचे सचिव तथा कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, तापी खोरे विकास महामंडळाचे सचिव तथा कार्यकारी संचालक संजय कुलकर्णी यांच्यासह विद्यापीठाचे कृषी अधिष्ठाता डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. दिलीप मानकर व कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे यांची प्रमुख उपस्थिती राहील.दोन दिवसीय महाराष्ट्र सिंचन परिषदेच्या आयोजनासाठी सिंचन सहयोग अध्यक्ष तथा विभाग प्रमुख सिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग डॉ. सुधीर वडतकर, डॉ. पंदेकृवि, अकोला, उपाध्यक्ष सिंचन सहयोग अकोला तथा अधीक्षक अभियंता संजयकुमार अवस्थी यांच्यासह विविध समिती अध्यक्ष, सचिव आणि सभासद यांचाही सहभाग राहील.
पाण्यावर होणार मंथन; अकोल्यात सिंचन परिषद अकोल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 12:41 PM