तेल्हाऱ्यातील शासकीय कर्मचाऱ्याची बदलीसाठी सिनेस्टाइल धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:46 AM2021-01-13T04:46:18+5:302021-01-13T04:46:18+5:30
तेल्हारा : बदलीसाठी चक्क सिनेस्टाइल धडपड करणाऱ्या तेल्हारा येथील शासकीय कर्मचाऱ्याचे ठाणेदारांच्या कल्पकतेमुळे काही तासांतच बिंग फुटले. चित्रपटात शाेभेल ...
तेल्हारा : बदलीसाठी चक्क सिनेस्टाइल धडपड करणाऱ्या तेल्हारा येथील शासकीय कर्मचाऱ्याचे ठाणेदारांच्या कल्पकतेमुळे काही तासांतच बिंग फुटले. चित्रपटात शाेभेल असा अभिनय करून स्वत:ला मारहाण झाल्याची फिर्याद नाेंदविण्यासाठी तेल्हारा पाेलिसांत गेलेल्या दाेन्ही भावांचा ड्रामा पाेलिसांनी खाक्या दाखवताच समाेर आला. दाेघांनीही माफी मागितल्यामुळे पाेलिसांनी या प्रकरणावर पडदा टाकला.
शहरातील एका शासकीय संस्थेतील कर्मचारी काही दिवसांपूर्वीच अनुकंपावर नोकरीवर रुजू झाला, पण त्याला तेथे नोकरी न करता आवडीनुसार दुसऱ्या जागी बदली पाहिजे असल्याने त्याने व त्याच्या भावाने सिनेस्टाइल शक्कल लढवली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सिनेस्टाइल आराखडाही तयार केला. त्यानुसार त्यांचा सिनेमाही सुरू झाला. त्यामध्ये मुख्य भूमिका निभावणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याने तेल्हारा पाेलिसांत धाव घेतली. त्याने पाेलिसांना सांगितले की, मला सुटीच्या दिवशी येथील तीन-चार लाेकांनी शासकीय आवारात येऊन रॉड व ट्युबलाइट मारून मारहाण केली. तसेच ‘तू येथे नोकरी करू नको, तुला आम्ही जिवाने मारून टाकू’ अशी धमकीही मारेकऱ्यांनी दिल्याचे त्याने पाेलिसांना सांगितले. फिर्याद दाखल करण्याच्या उद्देशाने त्याने तेल्हारा पाेलिसांसमाेर आपबिती कथन केली. त्याला सहकार्य करणारा फिर्यादीचा भाऊसुद्धा पोलीस स्टेशनला हजर होऊन गुन्हा दाखल करण्यासाठी ठाणेदारांवर दबाव टाकत हाेता. दाेघांचेही ठरल्याप्रमाणे घडत असताना ठाणेदार दिनेश शेळके यांनी कल्पकतेने हे प्रकरण हाताळले. पाेलिसांनी खाक्या दाखवताच दाेघांच्याही सिनेमाचे बिंग फुटले. फिर्याद दाखल करण्यासाठी आलेल्या शासकीय कर्मचाऱ्याने खरी कहाणी सांगितली. ‘साहेब नुकतीच नोकरी लागली आहे, आपण कार्यवाही केली तर नोकरी जाईल’, अशी हे दोघे भाऊ गयावया करू लागल्याने माणुसकी व सामाजिक भान ठेवत पोलीस निरीक्षकांनी गुन्हा दाखल न करता प्रकरण निवळले.
राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचा ठाणेदारांना फाेन
या प्रकरणात सुरवातीला गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हातील एका राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचा ठाणेदारांना फाेन आला हाेता. मात्र ठाणेदार दिनेश शेळके यांनी ‘आपल्या स्टाइल’ने हे प्रकरण हाताळल्यामुळे प्रकरणाचा खरा चेहरा समाेर आला. नंतर पुन्हा त्याच जिल्हाध्यक्षांनी ठाणेदारांना ‘साहेब, आमचा कार्यकर्ता आहे, जाऊ द्या’ असाही फोनवर संवाद साधला.