शहर बस वाहतूक सेवा ठप्प; दुसऱ्या दिवशीही तोडगा नाहीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 01:39 PM2019-06-08T13:39:31+5:302019-06-08T13:39:37+5:30
अकोला : उत्पन्न कमी अन् खर्च जास्त होत असल्याच्या सबबीखाली शहर बस वाहतूक सेवा दुसºया दिवशीही ठप्प पडल्याचे दिसून ...
अकोला: उत्पन्न कमी अन् खर्च जास्त होत असल्याच्या सबबीखाली शहर बस वाहतूक सेवा दुसºया दिवशीही ठप्प पडल्याचे दिसून आले. महापालिका आयुक्त संजय कापडणीस दीर्घ रजेवर असल्यामुळे या विषयावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाच्यावतीने उपायुक्त विजयकुमार म्हसाळ किंवा उपायुक्त प्रमोद कापडे यांनी पुढाकार घेऊन बस वाहतूक सेवेच्या संचालकांसोबत चर्चा करणे अपेक्षित होते. यादरम्यान, सिटी बसने प्रवास करणाºया सर्वसामान्य अकोलेकरांना मनस्ताप सहन करावा लागत असून, आॅटो चालकांचे चांगलेच फावले असल्याचे चित्र समोर आले आहे.
महापालिका प्रशासनाच्यावतीने अकोलेकरांच्या सुविधेसाठी जानेवारी २०१७ मध्ये शहर बस वाहतूक सेवा सुरू करण्यात आली. याकरिता श्रीकृपा ट्रॅव्हल्ससोबत ३५ सिटी बसचा करार करण्यात आला. त्यापैकी पहिल्या टप्प्यात पाच बस सुरू करण्यात आल्या. जानेवारी २०१८ मध्ये आणखी पंधरा बस शहरात दाखल झाल्या. आज रोजी २० पैकी १८ बस शहरवासीयांच्या सुविधेसाठी कार्यान्वित आहेत. यादरम्यान बस संचालकांना अपेक्षित उत्पन्न प्राप्त होत नसल्याची स्थिती निर्माण झाल्याचे बोलल्या जात आहे. मध्यंतरी दोन महिन्यांपूर्वी थकीत वेतनाच्या मागणीसाठी सिटी बसवरील वाहक-चालकांनी कामकाज बंद केले होते. त्यावेळी धावपळ करून वाहक-चालकांना वेतन देऊन बस सेवा सुरू करण्यात आली. आता पुन्हा एकदा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्यामुळे संचालकांनी ६ जूनपासून बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. बस सेवा बंद झाल्यामुळे सर्वसामान्य अकोलेकरांमध्ये नाराजी पसरली आहे. यावर शुक्रवारी बस वाहतूक सेवेचे संचालक व मनपा प्रशासनाच्यावतीने ठोस तोडगा काढणे अपेक्षित होते. तसे न झाल्यामुळे ही बस सेवा कधी सुरू होईल, असा सवाल अकोलेकरांनी उपस्थित केला आहे.
प्रशासनाची गाडी घसरली!
मनपा आयुक्त संजय कापडणीस रजेवर असताना उपायुक्त विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त प्रमोद कापडे यांच्यासारख्या अनुभवी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येतून मार्ग काढणे अपेक्षित आहे. आयुक्त रजेवर जाताच प्रशासकीय कामकाजाची गाडी रुळावरून घसरल्याचे चित्र दिसून येत आहे. दोन्ही उपायुक्तांच्या कामकाजाची शैली पाहता त्यांना प्रशासकीय घडी सुधारण्यात कवडीचाही रस दिसत नसल्याचे बोलल्या जात आहे.
शहर बस वाहतूक सेवेसाठी कंपनीच्या संचालकांना अपेक्षित असा करारनामा करून देण्यात आला. उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणे ही त्यांच्या अखत्यारीतील बाब आहे. बस सेवा बंद करणे हा पर्याय होऊ शकत नाही. ही परिस्थिती कायम ठेवल्यास निविदा प्रक्रिया राबवावी लागेल.
-विजय अग्रवाल, महापौर.
उत्पन्न वाढ का होत नाही, यासंदर्भात प्रशासनाला पत्रव्यवहार करून अवगत केले आहे. त्यावर उपाययोजना होणे अपेक्षित होते. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याची वस्तुस्थिती असल्याने नाइलाजाने सेवा थांबविण्याचा निर्णय घ्यावा लागला. यावर तोडगा काढण्याची अपेक्षा आहे.
-राजेश माने, संचालक श्रीकृपा ट्रॅव्हल्स.