- राजेश शेगोकार
अकोला: अकोट विधानसभा मतदारसंघ हा सध्या उमेदवारीसाठी सर्वाधिक स्पर्धा असलेला मतदारसंघ ठरला आहे. या मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत प्रकाश भारसाकळे यांनी भाजपाचे कमळ फुलविल्यानंतर भाजपाची विजयी घौडदौड स्थानिक स्वराज्य मतदारसंघातही सुरू झाली. या यशामुळेच स्थानिक भाजप नेतृत्वाच्या महत्त्वाकांक्षांना घुमारे फुटले आहेत, तर दुसरीकडे आ. भारसाकळे यांच्या संदर्भात स्वपक्षातच नाराजीचे सूर स्पष्टपणे ऐकू येऊ लागल्याने सध्या या मतदारसंघात ‘घरचा’ उमेदवार हा आवाज बुलंद होत असून, आता त्यामध्ये काँग्रेसी विचारांचा आयात उमेदवार नको याची भर पडली आहे.अकोट विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा गड होता. या मतदारसंघावर १९९० मध्ये भगवा फडकल्यानंतर काँग्रेसला विजय मिळविणे कठीण झाले आहे. १९९०, ९५, २००४, २००९ असे चारवेळा सेनेला यश मिळाले. त्यामुळे सेनेची ताकद या मतदारसंघात वाढली; मात्र २०१४ मध्ये दर्यापूर येथून अकोटात भाजपाचे कमळ घेऊन आलेल्या प्रकाश भारसाकळे यांना मोदी लाटेने आमदार केले; मात्र आमदारांच्या प्रती नाराजीचा सूर वाढू लागला. बाहेरचा उमेदवार नको म्हणून दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चेला गेल्या महिन्यात बैठकांचा आवाज मिळाला व थेट पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत लेखी स्वरूपात निवेदने सुरू झाली. स्थानिक उमेदवारच द्या म्हणून एकवटलेल्या भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर आता आयात उमेदवाराचेही आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळेच रविवारी याच कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन स्थानिक द्या; पण आयात नको, असा सूर आवळला असल्याने या मतदारसंघात भाजपामध्येच उमेदवारीबाबत असलेली अस्वस्थता समोर आली आहे. पक्षश्रेष्ठी या आवाजाची दखल घेतात की उमेदवार ‘लादतात’ याकडे राजकीय वर्तृळाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेलाही हवा ‘घरचा’ उमेदवार!अकोट मतदारसंघात स्थानिक उमेदवार द्या या भाजपाच्या सुरात मित्रपक्ष शिवसेनेही सूर आवळला. सेनेच्या दृष्टीने स्थानिक म्हणजे मतदारसंघाबाहेरील उमेदवार अपेक्षित होते. अकोल्यातील अनेकांना अकोटचे डोहाळे लागले होते. त्यामुळे सेनेने स्थानिकचा आग्रह धरला होता. आता या स्थानिकला ‘बाहेरून आलेलाही नको’ अशी मागणी चिकटली आहे. भाजपा-सेना युतीमध्ये हा मतदारसंघ सेनेला सुटलाच तर भाजपाचा सुंठीवाचून खोकला जाईल; मात्र युती तुटली तर सेनेचा उमेदवार कोण, हे समोर आल्यावर अनेकांना ठसका बसण्याची चिन्हे आहेत. असे सुरू आहेत प्रयत्न१) ९ आॅगस्ट रोजी अकोट येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात अकोट तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक पार पडली.२) ११ आॅगस्ट रोजी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांना निवेदन देण्यात आले.३) १३ आॅगस्ट रोजी भाजपा नगरसेवक व भाजयुमो पदाधिकारी यांनी विधानसभा निवडणूक अकोला जिल्हा प्रभारी किरण पातूरकर यांना भेटून निवेदन दिले.४) १९ आॅगस्ट रोजी तेल्हारा येथे तेल्हारा तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची दुसरी बैठक भागवत मंगल कार्यालयात पार पडली.५) ३१ आॅगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर, पश्चिम विदर्भ संघटक मंत्री उपेंद्र कोठेकर यांना भेटून निवेदन दिले.६) २ सप्टेंबर रोजी ऊर्जामंत्री बावनकुळे यांना ३० इच्छुक उमेदवारांनी स्थानिक उमेदवारी मागणीचे सामूहिक निवेदन दिले.७) ४ सप्टेंबर रोजी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार भारसाकळे नको, स्थानिक कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या, असे निवेदन दिले.८) ८ सप्टेंबर रोजी अकोट तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी इच्छुक उमेदवार यांची सामूहिक बैठक राजमंगल कार्यालयात पार पडली.