दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सामाजिक शास्त्र विषयाच्या आलेखाचे गुण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 01:11 PM2019-05-07T13:11:17+5:302019-05-07T13:11:23+5:30
सामाजिक शास्त्र २, भूगोल विषयाच्या आलेखाच्या प्रश्नांचे पैकीच्या पैकी गुण दिले जातील, असे आश्वासन दिले.
अकोला: इयत्ता दहावीच्या सामाजिक शास्त्र पेपर २ च्या प्रश्नपत्रिकेसोबत आलेख उत्तर पुरवणी देण्यात न आल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार होते; परंतु यासंदर्भात शिक्षक महासंघाचे शेखर भोयर यांनी शनिवारी शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिवांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र विषयाच्या आलेखाचे गुण देण्याची मागणी केली. त्यानुसार विभागीय सचिवांनी विद्यार्थ्यांना अन्याय करणार नसून, त्यांना सामाजिक शास्त्र २, भूगोल विषयाच्या आलेखाच्या प्रश्नांचे पैकीच्या पैकी गुण दिले जातील, असे आश्वासन दिले.
इयत्ता दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गुणांच्या आधारे विद्यार्थी विविध शाखांना प्रवेश घेतात; परंतु दहावीच्या सामाजिक शास्त्र २ व भूगोल विषयाची परीक्षा २२ मार्च रोजी पार पडली. परीक्षेदरम्यान सामाजिक शास्त्र २, भूगोल प्रश्नपत्रिकेला आलेख पुरवणी (उत्तरपत्रिका) देणे आवश्यक होते. दरवर्षी या पेपर मध्ये आलेखावरील प्रश्न असतोच व आलेख उत्तरपत्रिकासुद्धा पुरविल्या जातात; परंतु यंदा शिक्षण मंडळाने आलेख उत्तरपत्रिका दिल्या नाहीत. भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न क्र. ६ (अ) हा सांख्यिकीय माहितीच्या आधारे आलेख काढण्याच्या पद्धतीचा होता; परंतु परीक्षेदरम्यान परीक्षा मंडळाकडून आलेखच प्राप्त न झाल्यामुळे ऐनवेळी हा प्रश्न कसा सोडवावा, अशी समस्या विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाली. आलेख उत्तरपत्रिका न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी हा प्रश्न तसाच सोडून दिला. त्यामुळे या प्रश्नाचे गुण मिळतील की नाही, असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला होता. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांचे नुकसान होऊ नये, परीक्षा मंडळाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना तो प्रश्न सोडविता आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचे गुणदान करण्याची मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक शेखर भोयर यांनी अमरावती विभागीय परीक्षा मंडळाच्या सचिवांसोबतच परीक्षा मंडळ सचिव, पुणे यांच्याकडे केली. विभागीय सचिवांनी विद्यार्थ्यांना आलेखाच्या प्रश्नाचे पैकीच्या पैकी गुण दिले जातील, असे आश्वासन दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही.