दीड किलोमीटरपर्यंत मोर्णा नदीचे पात्र स्वच्छ; आयुक्तांनी केली पाहणी

By नितिन गव्हाळे | Published: April 4, 2024 10:08 PM2024-04-04T22:08:08+5:302024-04-04T22:08:35+5:30

महापालिकेची जलकुंभी काढण्याची माेहीम युद्धपातळीवर

Clear Morna riverbed up to one and a half kilometers; Commissioner inspected | दीड किलोमीटरपर्यंत मोर्णा नदीचे पात्र स्वच्छ; आयुक्तांनी केली पाहणी

दीड किलोमीटरपर्यंत मोर्णा नदीचे पात्र स्वच्छ; आयुक्तांनी केली पाहणी

अकोला : महापालिकेच्या वतीने गत महिन्याभरापासून मोर्णा नदीच्या पात्रात जलकुंभी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वाढत्या जलकुंभीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, ही जलकुंभी काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. आतापर्यंत हिंगणा भागापासून ते अनिकटच्या भवानी मंदिरापर्यंतचा दीड किलोमीटरपर्यंत मोर्णा नदीचे पात्र स्वच्छ करण्यात आले आहे.

गुरुवारी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने यांनी मोर्णा नदी पात्राची पाहणी केली. काही वर्षांपूर्वी लोकसहभागातून मोर्णा नदीपात्रामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेला अकोलेकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. मात्र, काही कारणांमुळे ही स्वच्छता मोहीम बारगळली होती. त्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांनी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मोर्णा नदीपात्रातील जलकुंभी काढण्याची मोहीम सुरू केली होती. त्यांच्या बदलीनंतर ही मोहीम मनपा आयुक्त डॉ. लहाने यांनी कायम ठेवली.

सद्यस्थितीत मोर्णा नदीपात्रातील जलकुंभी काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत असून, महिन्याभराच्या कालावधीमध्ये दीड किलोमीटरपर्यंत पात्रातील जलकुंभी काढण्यात आल्याने, मोर्णा नदीने मोकळा श्वास घेतला आहे. परिसरातील चिमुकले नदीपात्रातील पाण्यात पोहण्याचा आनंद लुटत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अकोला शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या मोर्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलकुंभी साचल्यामुळे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने यांच्या आदेशान्वये तसेच मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात मोर्णा नदीतील जलकुंभी काढण्याचे काम मनपा प्रशासनाद्वारा युद्धपातळीवर करण्यात येत आहे.

कामास गती देण्याचे आयुक्तांचे निर्देश
यावेळी मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांना जलकुंभी काढण्याच्या कामामध्ये गती वाढविण्यासाठी लागणारे साहित्य, मजूर आदी वाढवून काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जलकुंभी काढण्यासोबत डासअळीनाशक फवारणी करण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने फवारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. यावेळी मनपा उपायुक्त गीता ठाकरे, जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा, सर्पमित्र बाळ काळणे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Clear Morna riverbed up to one and a half kilometers; Commissioner inspected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.