अकोला: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुका स्थगित करण्यात आल्याने, या पोटनिवडणुकांची आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या १४ आणि जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या २८ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी संबंधित क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली होती. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित करण्यात येत असल्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने ९ जुलै रोजी दिला असून, या पोटनिवडणुकांची आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे. त्यानुषंगाने आचारसंहितामुळे रखडलेली जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध विकासकामे मार्गी लावण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आचारसंहिता शिथिल झाल्याने जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि विकासकामे सुरू करण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित करण्यात आल्या असून, या निवडणुकांसाठी लागू करण्यात आलेली आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत विकासकामांची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहेत.
सौरभ कटियार
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद