हवामान बदलाचा परिणाम शेती, अर्थकारणावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:18 PM2019-12-21T12:18:52+5:302019-12-21T12:19:05+5:30
कमी दिवसांत अधिक पाऊस किंवा १८ तासांतच वर्षाचा सरासरी अर्धा पाऊस होताना दिसत आहे. तापमानातही बदल होत आहे. यावर्षीचा पावसाळा नोव्हेंबर महिन्यापर्यंत होता. याचा परिणाम पिके व उत्पादनावर झाला आहे.
- राजरत्न सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: हवामान बदलाचा परिणाम शेती, शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होताना दिसत असून, बदलत्या हवामानाची अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविसाठी स्वतंत्र संशोधन कें द्र, आचार्य (पीएचडी)पदवी अभ्याक्रम सुरू करावा, यासाठीचे प्रयत्न डॉ. पंजाबराव देशमुख कृषी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सुरू केले आहेत; परंतु शासनाकडून दखल घेण्यात आली नाही. यावर्षी पुन्हा नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
पावसाचे चित्र बदलले आहे. कमी दिवसांत अधिक पाऊस किंवा १८ तासांतच वर्षाचा सरासरी अर्धा पाऊस होताना दिसत आहे. तापमानातही बदल होत आहे. यावर्षीचा पावसाळा नोव्हेंबर महिन्यापर्यंत होता. याचा परिणाम पिके व उत्पादनावर झाला आहे. भौगोलिकदृष्ट्या राज्यात नऊ कृषी हवामान विभाग असून, डोंगराळ, सपाट, खोलगट प्रदेश आहेत. प्रत्येक विभागातील पीक रचना भिन्न आहे. यानुसार शेतकºयांना कृषीविषयक माहिती देताना कृषी शास्त्रज्ञांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ही स्थिती दरवर्षी निर्माण होत असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी व स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने स्वतंत्र अभ्यास करण्यासाठी कृषी हवामान केंद्र, बळकटीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे. शेतीला स्थैर्य द्यायचे असेल, तर कृषी हवामानाचा अंदाज घेऊन सूक्ष्म पातळीवर शेतकºयांना सल्ला देता आला पाहिजे, हा यामागे उद्देश आहे. याकरिता तालुका स्तरावर माणसे लागणार आहेत. म्हणूनच शिक्षित मनुष्यबळाची गरज भासणार आहे. या सर्व बाबींचा अंतर्भाव कृषी विद्यापीठाने पुन्हा नवीन प्रस्तावात केला आहे.
कृषी हवामानावर ‘पीएचडी’ नाही!
महाराष्ट्र प्रगत राज्य असताना, या विषयावर महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत पुणे येथील केंद्र वगळता राज्यात दुसरीकडे पीएचडी करता येत नाही. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करायचे असेल, तर कृषी विद्यापीठांतर्गत स्वतंत्र केंद्र व पीएचडीचा अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज आहे.
हवामान बदलाचे आव्हान बघता कृषी हवामान संशोधन, शिक्षण अभ्यास केंद्र मिळावे, यासाठी आग्रही आहोत. स्वतंत्र हवामान विभागाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे. आता नवीन माहितीसह प्रस्ताव तयार केला आहे.
- डॉ. व्ही. एम. भाले, कुलगुरू ,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.